नवी दिल्ली : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी कोणताही कायदा करण्याची केंद्राची कोणतीही योजना नाही, असे केंद्र सरकारने (१२ ऑगस्ट) संसदेत स्पष्ट सांगितले. (Centre’s reply on Cow)
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल यांनी ही माहिती संसदेत दिली. (Centre’s reply on Cow)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात बघेल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘नाही, गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही. संविधानाच्या कलम २४६(३) नुसार, केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक अधिकारांनुसार, प्राण्यांचे संरक्षण हा असा विषय आहे ज्यावर राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचे विशेष अधिकार आहेत.’’
गायींच्या संवर्धन, संरक्षण आणि संगोपनासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार डिसेंबर २०१४ पासून राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवत असल्याचे मंत्री म्हणाले.
दुधाच्या उत्पादनाबाबत बोलताना श्री. बघेल यांनी, २०२४ मध्ये देशाच्या एकूण २३९.३० दशलक्ष टन दूध उत्पादनात गाईच्या दुधाचा वाटा ५३.१२% होता, तर म्हशीच्या दुधाचा वाटा ४३.६२% होता, असे त्यांनी सभागृहात सांगितले.