कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीणीची वनतारातून आज बुधवारी सायंकाळी कोल्हापुरला रवानगी करण्यात आली. नांदणीतील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थाचे वकील मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे माधुरी हत्तीणीला परत आणण्याच्या लोकलढ्याला यश आले आहे. (Madhuri the elephant returns)
प्राणीप्रेमी मित्रांची पेटा ने नांदणीतील माधुरी हत्तीची देखभाल होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर माधुरी हत्तीची रवानगी गुजरातमधील अंबानी उद्योगसमुहाच्या वनतारामध्ये करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आंदोलन केले होते. त्यासाठी नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्राही काढण्यात आली होती. मुंबई हायकोर्टातही दाद मागण्यात आली. अखेर आज लोकलढा आणि कायदेशीर लढ्याला यश आले आणि माधुरी हत्तीणीचा नांदणी मठात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
आज बुधवारी ऑनलाइन सुनावणीनंतर हाय पावर कमिटीने निकाल राखून ठेवला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समितीने निकाल जाहीर करत माधुरी हत्तीणीला कोल्हापूरला जाण्यास परवानगी दिली. मठाचे वकील मनोज पाटील यांनी तातडीने कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना झाली असल्याची माहिती मनोज पाटील यांनी दिली. (Madhuri the elephant returns)
उच्चस्तरीय समितीसमोर नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने नांदणी मठात माधुरी हत्तीणीसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. माधुरीला पुन्हा नांदणीला पाठवण्याची मागणी करण्यात आली. समितीने सर्व माहिती ऐकूण घेऊन माधुरी परत पाठवण्याचा निर्णय घेतला.
उच्चस्तरीय समितीने २३ जुलै रोजी एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये उच्चस्तरीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र शासन आणि वन विभागाचे प्रतिनिधी, सेंट्रल झु चे सदस्यांचा समावेश होता. १७ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत माधुरी हत्तीणीसाठी नांदणीत कोणत्या सुविधा केल्या आहेत याचा पाहणी अहवाल पाच ऑगस्टपर्यंत सादर करण्याचा आदेश दिला. संयुक्त समितीने नांदणी सुविधांची पाहणी करुन समितीकडे अहवाल सादर केला. त्यानंतर आज बुधवारी ऑनलाईन सुनावणीत माधुरीला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Madhuri the elephant returns)