Home » Blog » Parth Pawar cleared of charges : पार्थ पवारांना गुन्ह्यातून वगळले, विरोधकांचा हल्लाबोल

Parth Pawar cleared of charges : पार्थ पवारांना गुन्ह्यातून वगळले, विरोधकांचा हल्लाबोल

by प्रतिनिधी
0 comments
Parth Pawar cleared of charges

पुणे : प्रतिनिधी : कोरेगाव पार्क येथील ३०० कोटी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्क विभागाने बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या व्यवहारामधील प्रमुख उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले. पार्थ पवारांचे नाव वगळण्यात आल्यावर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. (Parth Pawar cleared of charges)

पार्थ पवारांनी पुण्यातील कोरगाव पार्क येथील मोक्याची १८०४ कोटी रुपये किंमतीची ४० एकर जमीन ३०० कोट रुपयामध्ये खरेदी केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन व्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर सरकारी यंत्रणा जोरात हलली. पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उप निबंधकांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने समितीही स्थापन केली. मुद्रांक विभागाने गुरुवारी सायंकाळी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पार्थ पवारांचे नाव वगळून तिघांवर गुन्हा दाखल केला. (Parth Pawar cleared of charges)

फिर्यादीने नाव न दिल्याने पार्थचे गुन्ह्यात नाव नाही

डीसीपी विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.  पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर कोरेगाव जमीन व्यवहार प्रकरणात शितल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यांच्यावर आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने तक्रारीत सध्या तरी पार्थ पवार यांचे नाव दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही, असेही ते म्हणाले. (Parth Pawar cleared of charges)

शासनाचे सहा कोटींचे नुकसान

डीसीपी गायकवाड म्हणाले, आरोपी शितल तेजवाणीने या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचे सांगत जागा विक्रीचा व्यवहार केला‌. त्यानंतर आरोपी दिग्विजय पाटील यांनी पार्थ पवारांचा मामेभाऊ आणि व्यवसायिक भागीदार असल्याचे सांगत पाच कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपये इतके मुद्रांक शुल्क बुडवण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील उपनिबंधक रविंद्र तारु यांच्याशी संगनमनत केले. सेस वसुल करणे अपेक्षित असताना रविंद्र तारु यांनी शासनाचे पाच कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे मुद्रांक शुल्क न घेता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे. तसेच स्टँम्प ड्युटी बुडवल्याप्रकरणी देखील तपास होईल.

एफआयआर मध्ये स्कॅम? :दमानिया

पार्थ पवारांचे नाव गुन्ह्यातून वगळल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली आहे. अंजली दामानिया यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, एआयआर झाला पण त्यातही स्कॅम? पार्थ अजित पवारचे नाव नाही आणि कंपनीचे पण नाव नाही? का? ह्यातून सुद्धा वाचवण्याची तयारी ? बास करा राजकारण. चौकशी करा आणि शिक्षा द्या. ह्या वेळी जी समिती स्थापन होईल, त्यात फक्त शासकीय अधिकारी नाही, जनतेतून सुद्धा प्रतिनिधी हवेत. मी हे प्रतिनिधित्व करायला तयार आहे.

पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न : अंधारे

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जमीन व्यवहाराचे कागदपत्र सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यावर पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे. ”पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का ? एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरलेला असताना आणि विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं?” असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी आहे आणि दिग्वीजय फक्त एक टक्का भागीदार आहेत‌. मात्र पार्थ पवार यांच्या ऐवजी दिग्वीजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत न्यायमूर्तीकडून चौकशी करावी : दानवे

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट करत म्हटलंय की, कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल तर झाला पण या मध्ये पार्थ पवार अथवा त्यांच्या कंपनीचे नाव साफ साफ वगळण्यात आले! म्हणजे सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत. ते ही प्रकरण उघडकीस आल्याच्या अवघ्या २४ तासात. असं नाही चालणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदय. या विषयाची चौकशी करणारे अधिकारी विकास खारगे निश्चितच स्वच्छ प्रतिमेचे आहेत. पण प्रकरणात गुंतलेली नावे पाहता यामध्ये कडक बाण्याचे एक निवृत्त न्यायमूर्तीही सरकारने द्यायला हवेत.

चोर..चोर..मावसभाऊ : वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवावर यांनी तिखट शब्दात सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले,  एकूणच एक म्हण आहे की, “राज्यसभा मैं न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठायेगा…” तर असेच आता सुरू आहे. महायुतीचे सरकार म्हणजे, “आळी पाळी गुपचिळी”, “तू ही खा, मी ही खातो” “तू मला वाचव, मी तुला वाचवतो.” असं आहे. या राज्यात आता चोर चोर मावस भाऊ असा कारभार सुरू असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. घोटाळ्यावर घोटाळे होत आहे आणि कोणतीच कारवाई होत नाहीये, याकडेही  वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00