Home » Blog » एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच? : हर्षवर्धन सपकाळ

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच? : हर्षवर्धन सपकाळ

by प्रतिनिधी
0 comments
Sapakal criticizes Fadnavis over MPSC paper leak

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी )अन्न व औषध निरीक्षक भरती पेपरफुटीचे धागेदोरे हे आता पुणे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचले असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे माजी पीए आणि  भाजप आमदार  अभिमन्यू पवार यांच्याकडे संशयाची सुई वळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसच पेपरफुटीचे आका आहेत का?, असा संशय निर्माण होत आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Sapakal criticizes Fadnavis over MPSC paper leak)

आपल्या लोकांना सेवेत घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव : रोहित पवार

राज्यात एमपीएससीचा पेपर फुटला नसल्याचा दावा सरकार व आयोगाकडून केला जात असला तरी त्याबाबतच्या काही प्रश्न परीक्षेपूर्वी ठराविक जणांना व्हॉट्सअपवर पाठविण्यात आले होते, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्क्रीनवर सादरीकरण करीत केला होता. आपल्या विचारधारांच्या लोकांना सेवेत घेण्यासाठी सत्ताधाऱ्याकडून हा डाव करण्यात येत असल्याचाही त्यांनी म्हटले आहे. आता याबाबत चर्चा सुरू असून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Sapakal criticizes Fadnavis over MPSC paper leak)

फडणवीस काळातील सर्व परीक्षांमध्ये घोटाळा?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून मुख्यमंत्र्यांना यासाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७-१८ मधील महाभरती पोर्टल घोटाळ्यासह त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेली तलाठी भरती – २०२३,  म्हाडा, पोलीस भरती, वनविभाग भरती, मृद व जलसंधारण विभाग भरती आणि आताच्या अन्न व औषध निरीक्षक भरती घोटाळा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या आणि भविष्याशी क्रूर खेळ करणाऱ्यांना उघडे पाडल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Sapakal criticizes Fadnavis over MPSC paper leak)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!