पुणे : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने १८०० कोटीं रुपये किंमतीची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा व्यवहार उघडकीस आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महार वतनाची जमिन असतानाही तिचा व्यवहार घाईघाईने कसा झाला असा सवाल विरोधकांकडून होत आहे. या संदर्भात अजित पवार आणि पार्थ पवारांकडून अजुनही खुलासा झालेला नाही. पुण्यातील जैन बोर्डिग खरेदी विक्री व्यवहारानंतर अजित पवारांशी संबधित व्यवहार बाहेर आल्याने महायुतीच्या नेत्यांची प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. जैन बोर्डिंग खरेदी विक्री व्यवहारात भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आले होते. पण या जमिनीचा व्यवहार रद्द झाला आहे. (Land transactions by Parth Pawar)
जमिनीचा व्यवहार २७ दिवसात पूर्ण
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही माहिती पुराव्यासह सोशल मिडियावर पोस्ट केली. पार्थ पवार यांनी १८०० कोटी किंमतीची जमीन ३०० कोटीमध्ये घेऊन स्टँप ड्यूटी फक्त ५०० रुपये भरली आहे. या व्यवहारासाठी उद्योजक संचलनायाने ४८ तासात स्टँप ड्यूटी माफ केली आहे. हा व्यवहार फक्त २७ दिवसात झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. (Land transactions by Parth Pawar)
मुख्यमंत्री उप मुख्यमंत्र्यावर कारवाई करणार का?
अंजली दमानिया यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, “अजित पवारांची ही केस एकनाथ खडसेंसारखीच नाही का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार?” असा सवालच दमानिया यांनी सुरुवातीला उपस्थित केला आहे. तसेच, “पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी नावाच्या कंपनीने, १८०४ कोटीची महार वतनाची जमीन ३०० कोटीला घेतली? या व्यवहारात दोन दिवसात स्टँप ड्यूटी देखील माफ करण्याचे आदेश आले?” असा प्रश्नही दमानियांनी उपस्थित केला आहे. (Land transactions by Parth Pawar)
महसुलमंत्री जमीन जप्तीचे आदेश कधी देणार?
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासंबधीत उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. महार वतनाची जमिन सरकारच्या परवानगीशिवाय विक्री, हस्तांतरीत किंवा गहाण ठेवता येत नाही. परवानगी न घेता अशा जमिनीची विक्री झाली तर ती बेकायदेशीर ठरते. अशावेळी जमनी पुन्हा सरकारकडे जाऊ शकते. या संदर्भात महसूल मंत्री या जमीन जप्तीचे आदेश कधी देणार असा प्रश्नही दमानियांनी विचारला आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (Land transactions by Parth Pawar)