‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला. त्याचा सदैव मान राखीन…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुमार कांबळे :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात लवकर भेट द्यावी यासाठी महाराजांनी पावले उचलायला सुरवात केली. आंबेडकरांनीही कोल्हापूर भेटीचे निमंत्रण आनंदाने स्वीकारले होते. (Dr. Ambedkar)

त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी कोल्हापुरातील स्नेही दत्तोबा पोवार यांना पत्र पाठवले आणि कोल्हापूरला येण्याची तारीख कळवली. महाराजांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. पोवार, त्यांचे मित्र गंगाधर पोळ आणि महाराजांचे खासगी सचिव रा. सा. कुंभोजकर यांनी रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांचे स्वागत केले. तेथून रेल्वेस्टेशनसमोरील रेस्ट हाऊसमध्ये म्हणजे जुने शाहूपुरी पोलिस ठाणे येथे त्यांचे चहापान झाले. त्यानंतर कुंभोजकर यांनी त्यांना घोड्यांच्या रथातून नवीन राजवाड्यावर नेले. महाराजांनी मोठ्या उत्साहात बाबासाहेबांचे स्वागत केले. या भेटीतच कोल्हापुरात बहिष्कृत वर्गाच्या लोकांची परिषद घेण्याचे ठरले. परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे डॉ. आंबेडकरांनी मान्य केले. कोल्हापूर संस्थानच्यावतीने बाबासाहेबांचा दोन दिवस पाहुणचार करण्यात आला. या दरम्यान महाराज चार घोड्यांच्या रथातून सोनतळी कॅम्पवरून रेस्ट हाउसवर आले. त्यांनी आंबेडकरांना रथात घेतले आणि शहरांतून फेरफटका मारला. महाराजांच्या अशा प्रत्येक कृतीमागे हेतू असे. त्यामुळे बहुजन समाजात एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले. परत जाताना त्यांनी सोनतळी कॅम्पवर भोजनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. तेथे ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूरच्या या पहिल्या भेटीच्या शेवटी महाराजांनी रितीरिवाजानुसार डॉ. आंबेडकरांना जरीफेट्याचा आहेर केला आणि त्यांची शहरातून मिरवणूक काढली. (Dr. Ambedkar)

यावेळी बाबासाहेबांनी ‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला त्याचा सदैव मान राखीन…,’ असे भावोद्गार काढले. बाबासाहेबांच्या या पहिल्या भेटीतच त्यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध घट्ट बांधले गेले. ते आयुष्याच्या अखेरपर्यंत राहिले.

कोल्हापूर हायकोर्टातील केस

कोल्हापूरला यायचे असेल तेव्हा ते पहिल्यांदा दत्तोबा पोवार यांना पत्राने कळवत. पोवार यांच्यामुळे गंगाधर पोळ हेही बाबासाहेबांशी जोडले गेले. त्यांच्याच बंधूंची केस बाबासाहेबांनी कोल्हापूर हायकोर्टात चालवली. गंगाधर यांचे वडील बंधू रामचंद्र यांच्या पत्नी कृष्णाबाई यांनी २६ मे १९२८ रोजी रावणेश्वर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. कृष्णाबाईच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्यामुळे रामचंद्र यांना अटक झाली. त्यांच्यावतीने शंकरराव दाभोळकर यांनी केस लढवली. मात्र रामचंद्र यांना कोर्टाने सात वर्षांची शिक्षा सुनावली.

ही बाब गंगाधर पोळ यांनी डॉ. आंबेडकरांना पत्राने कळवली. त्यावर, घाबरू नका, मी केस चालवतो. तुमच्या बंधूला सोडवू, असा धीर बाबासाहेबांनी दिला. त्यानुसार बाबासाहेबांनी कोल्हापूर हायकोर्टात केस चालवली आणि रामचंद्र पोळ यांची निर्दोष मुक्तता केली. या केससाठी जुलै १९२८ आणि सप्टेंबर १९२८ मध्ये जवळपास आठ दिवस बाबासाहेब कोल्हापुरात होते. पोळ यांनी बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था सरकारी गेस्ट हाऊसमध्ये केली होती.

बाबासाहेबांमुळे बंधू दोषमुक्त झाला. त्यांच्या ऋणातून अंशत: मुक्त व्हावे म्हणून गंगाधर पोळ यांनी मुंबईला जाऊन बाबासाहेबांची भेट घेतली. लोकरीची तीन जेने आणि रोख शंभर रुपये आंबेडकरांना अर्पण केले.

पैलवानांना सल्ला

बाबासाहेब कोल्हापुरात आले की, सर्व क्षेत्रांतील लोक त्यांची भेट घ्यायला उत्सुक असत. असेच एका कामानिमित्त आले असता सर्किट हाउसवर काही पैलवान त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी बाबासाहेब त्यांना उद्देशून म्हणाले, ‘सॅण्डो पैलवान कसा बांधेसूद आहे बघा. पण, तुमचे पोट सुटते. याचा अर्थ तुमच्या व्यायामपद्धतीत काहीतरी दोष असला पाहिजे. तुम्ही अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम करत जा.’ तेवढ्यात कुणीतरी त्यांना ‘बाबा, तुम्हीही व्यायाम करता का,’ असे मध्येच विचारले. त्यावर त्यांनी उजव्या बाह्या सरावत उत्तर दिले, ‘मी रोज योगासने करतो.’ (Dr. Ambedkar)

डॉ. माईसाहेब आंबेडकर ही आठवण त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात,’ या चरित्रग्रंथात दिली आहे.

कांदा नि भाकर

कोल्हापुरातील गुरुवर्य सासणे गुरुजी हे आदरणीय व्यक्तिमत्व. बाबासाहेबांनी ८ मे १९३० रोजी त्यांच्या शाहूपुरीतील घरी भेट दिली. बाबासाहेब आल्याचे समजताच ते एकदम धावत बाहेर आले. त्यांनी बाबासाहेबांना अलिंगन दिले आणि मोठ्या आदराने घरात नेले. सकाळी त्यांची न्याहरीची वेळ होती. बाबासाहेबांना त्यांनी न्याहरीचा आग्रह धरला. सोबत असलेले बी. एच. वराळे यांच्यासह सर्वांच्या हाती कांदा आणि भाकरी दिली. त्यांनी खायला सुरुवात केली आणि इतरांनीही सुरू करावे, अशी सूचना केली. ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला हेच खाणे आवडते,’  असे ते म्हणाले. बाबासाहेबांसह सर्वांनी ही कांदा-भाकर आनंदाने खाल्ली. बाबासाहेबांचे सर्वस्तरांतील लोकांशी असे जिव्हाळ्याचे संबंध होते.

राजाराम महाराजांनी पन्हाळ्यावर दिली जागा

बाबासाहेब कोर्टाचे काम किंवा इतर कामानिमित्त कोल्हापूरला आले की, त्यांची पन्हाळ्याची भेट हमखास ठरलेली असे. पन्हाळ्यातील वातावरण त्यांना खूपच आवडे. छत्रपती राजाराम महाराजांनी ही बाब माहीत होती. बाबासाहेब आपल्या संस्थानात वारंवार यावेत आणि त्यांचे वास्तव्य आपल्या नगरीत असावे, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना पन्हाळ्यावर जागाही दिली. त्यात विहीर खोदावी असा विचार बाबासाहेबांच्या मनात आला. काम सुरू केले. पण पाणी लागले नाही. त्यामुळे खोदाईचे काम थांबवण्यात आले. (Dr. Ambedkar )

मसाई पठार, चहाच्या मळ्याला भेट

एकदा पन्हाळ्यावर आले असताना बाबासाहेबांनी मसाई पठारला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दत्तोबा पोवार, गंगाधर पोळ, तुकाराम गणेशाचार्य यांनी सर्व ती व्यवस्था केली.  पन्हाळ्याहून हे सर्वजण पायी निघाले. वाटेत शाहू महाराजांनी केलेली चहाची बाग फिरून पाहिली. तेथून सर्वजण मसाई पठारावरील लेण्याजवळ पोहोचले. लेणी पाहिली. बाबासाहेबांना तेथील डोहात आंघोळ करण्याची इच्छा झाली. क्षणाचाही वेळ न लावता त्यांनी आंघोळ उरकून घेतली. त्यानंतर सहकाऱ्यांनी आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. संध्याकाळच्या सुमारात ते पन्हाळ्यावर परतले. (Dr. Ambedkar)

कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याची इच्छा

महानिर्वाणाआधी चार दिवस कोल्हापूरचे शामराव जाधव यांना नवी दिल्लीहून लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी कोल्हापूरची लोकसभा सर्वसाधारण जागेवरून लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शामराव जाधव यांनी राखीव जागेवरून निवडणूक लढवावी, असे त्यांनी जाधव यांना पाठवलेल्या पत्रांत म्हटले होते. मात्र सहा डिसेंबर १९५६ ला त्यांचे महानिर्वाण झाले. म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांचा कोल्हापूरशी जिव्हाळा होता, असे लक्षात येते.

कोल्हापूर, सावंतवाडी, सांगली, मिरज, निपाणी, धारवाड, हुबळी या परिसरात बाबासाहेबांच्या सभा झाल्या. बाबासाहेबांना सर्व समाजातील कार्यकर्त्यांचे पाठबळही या भागाने दिले. त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा त्यांनी आयुष्यभर जपला. त्या आठवणी अनेकांनी पुस्तकरुपाने लिहून ठेवल्या आहेत.

संदर्भ साहित्य

  • डॉ. आंबेडकरांच्या सहवासात : डॉ. सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर
  • डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार : सुधीर पोवार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सांगाती : बळवंतराव वराळे
  • बाबासाहेबांच्या सहवासातील शामराव जाधव : संपा. वसंतराव लिंगनूरकर

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली