Blood transportation: ड्रोनद्वारे रक्त पोहोचवणे शक्य : आयसीएमआर

Blood transportation

नवी दिल्ली : अतिदुर्गम भागात तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने रक्त किंवा रक्तघटक उपलब्ध करण्यासाठी त्याची वाहतूक ड्रोनद्वारे करणे शक्य आहे, असे संशोधन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने केले आहे. यासंबंधीच्या अभ्यासातील निष्कर्षही प्रकाशित करण्यात आले आहेत. (Blood transportation)

मात्र रक्त आणि रक्तघटकाची ड्रोनद्वारे वाहतूक करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. ‘द हिंदू’ने हे वृत्त दिले आहे.

रूग्ण अत्यवस्थ असेल किंवा त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असेल तर रक्त किंवा रक्तघटकांची आवश्यकता असते. त्यातही रूग्ण दुर्गम भागातील रूग्णालयात असेल तर त्याच्यापर्यंत रस्ते मार्गाने हे घटक लवकर पोहोचवणे अशक्य असते. या परिस्थतीवर मात करण्यासाठी ड्रोन वाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी खूपच काळजी घेतली पाहिजे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटले आहे. (Blood transportation)

 आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात ड्रोन-आधारित रक्त वितरणाचे रक्त घटकांवर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन केले. पारंपरिक वाहतूक आणि ड्रोनद्वारे होणारी रक्त वाहतूक याची तुलनाही यात करण्यात आली. या अभ्यासाचे उद्दिष्ट भारतात यशस्वी आणि शाश्वत ड्रोन-आधारित रक्त वितरण कार्यक्रम सुरू करणे हा आहे.

ड्रोन तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात, प्रामुख्याने दुर्गम भागात आणि ग्रामीण भागात, जीवनरक्षक वैद्यकीय साहित्य वेळेवर पोहोचवणे शक्य होते. त्यामुळे वैद्यकीय सुधारणा करता येणे शक्य आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.

वाहतुकीतील गुंतागुंत

तथापि, रक्त आणि त्याच्या घटकांची ड्रोन वाहतूक गुंतागुंतीची आहे. कारण त्यासाठी विशिष्ट तापमान कायम ठेवावे लागते. अन्यथा त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. उदाहरणार्थ, रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. शिवाय, ते अ‍ॅसेप्टिक परिस्थितीत किंवा उबदार वातावरणात आले तर बॅक्टेरियाच्या दूषिततेचा धोका वाढतो. (Blood transportation)

त्यामुळे रक्त आणि रक्तघटक वाहतुकीवेळी कोल्ड चेन अखंड राखणे आवश्यक आहे. रक्त घटकांचे जैवरासायनिक पॅरामीटर्स राखताना ड्रोन-आधारित वितरणादरम्यान टीमला जो अनुभव आला तोही या अभ्यासात नोंदविण्यात आला आहे.

‘‘ड्रोन-आधारित वाहतुकीदरम्यान, तापमान, रक्तपेशींची अखंडता आणि इतर पॅरामीटर्स राखले गेले, तर (पारंपरिक आणि ड्रोन-आधारित) वाहतूक पद्धतींत काही पॅरामीटर्समध्ये थोडे बदल दिसून आले. या अभ्यासात, ड्रोनने आठ मिनिटांत सुमारे ३६ किलोमीटर प्रवास केला, तर रस्ते वाहतुकीद्वारे (व्हॅन) ला तेच अंतर कापण्यासाठी सुमारे ५५ मिनिटे लागली,’’

-सुमित अग्रवाल, आय-ड्रोन प्रमुख (आयसीएमआर).

* अभ्यासात काय दिसून आले?

  • रक्तपेढ्या आणि रक्तसंक्रमण सेवा कठोर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतात. रक्त संकलनापासून ते रक्तसंक्रमणापर्यंतच्या रक्तपुरवठा साखळीत कडक तापमान नियंत्रणासह सर्व गुणवत्ता मानकांचे पालन करतात.
  • ड्रोन वाहतूक आणि रक्त जैवरासायनिक घटकांवर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होऊ शकतो म्हणून हवामान परिस्थिती महत्त्वाची ठरते. भारताच्या विविध आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे आरोग्यसेवा पुरवठा आणि वितरण प्रक्रियेत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. (Blood transportation)
  • इटली आणि रवांडासह इतर देशांमध्ये ड्रोन चाचण्यांवरून असे दिसून आले आहे की, वाहतूक मार्गातील वेग आणि अडथळे असूनही रक्त वाहतुकीसाठी ड्रोन हे एक व्यवहार्य साधन आहे. या वाहतुकीत रक्त आणि त्याच्या घटकांच्या अखंडतेवर काही परिणाम होत नाही.
  • दुसऱ्या एका आग्नेय आशियाई अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, पर्वत आणि नद्या यासारखी आव्हानात्मक भौगोलिक स्थिती, खराब किंवा रस्तेच नसणे अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी ड्रोनसारखे वाहतुकीचे पर्याय साधन वापरता येते.
  • आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद म्हणून उष्णकटिबंधीय देशांत ड्रोन हा एक संभाव्य पर्याय आहे. परंतु ड्रोनद्वारे वाहतूक करताना त्याची व्यावहारिकता, त्यातील आव्हाने आणि रक्ताच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याबद्दल अधिक वैज्ञानिक पुरावे आणि बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
  • ड्रोनद्वारे रक्त पिशव्यांची वाहतूक करताना तापमानासह इतर आव्हाने समजून घेणे महत्त्वाचे आहे.


Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर