भाजपच्या जाहिरातीमधून राजर्षी शाहूंना वगळले

कोल्हापूरः मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. मात्र बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली करणारे, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक चळवळीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचे नाव आणि छायाचित्र जाहिरातीतून वगळले आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह २४ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री, प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, उद्योजकांना आमंत्रण दिले आहे. शपथविधी सोहळ्याची जाहिरात भाजपने केली आहे. महाराष्ट्रातील झाडून प्रमुख दैनिकात भाजपने ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी जाहिरात केली आहे. महाराष्ट्राला आणि देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या श्रद्धास्थान असलेल्या थोर नेत्यांचे फोटो जाहिरातीमध्ये आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्ययोध्दा बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा ठळकपणे प्रसिद्ध केल्या आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्ते फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेत असतात. त्यांच्या विचारावर राज्य सुरू असल्याचे उठता बसता सांगत असतात. असे असताना भाजपने शाहू महाराजांचे छायाचित्र छापणे टाळले आहे. त्याविरोधात शाहूप्रेमींमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करुन दिली. देशात आरक्षणाची सुरुवात केली. सनातनी वृत्तीच्या लोकांनी शाहू महाराजांना हयातीत खूप त्रास दिला होता. अशा प्रवृत्तींनीच शाहूंची प्रतिमा मुद्दाम जाणीवपूर्वक टाळला असल्याचा आरोप केला जात आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर महाराष्ट्राने वेगाने प्रगती केली. त्याच महाराष्ट्रात शाहूंचे विचार थांबवण्यासाठी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हे सुचवायचे आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावरून उपस्थित केला जात आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांनीही माध्यमांशी बोलताना याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाहू महाराजांना बाजूला करण्याची गोष्ट महाराष्ट्र मान्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान इंडिया आघाडीच्यावतीने या जाहिरातीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. नव्या सरकारला शाहूंचे विचार मान्य नाहीत का, असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे. या जाहिरातीच्या निषेधार्थ गुरुवारी संध्याकाळी शाहूप्रेमी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळी जमून शाहू महाराजांना अभिवादन करणार आहेत.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली