Bachhu Kadu and Dhangekar : बच्चू कडू, धंगेकरांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे?

Kadu Dhangekar's problem

माजी आमदार बच्चू कडू आणि रवींद्र धंगेकर सध्या राज्याच्या पातळीवर चर्चेत आहेत. दोघंही संघर्षयोद्धे आहेत. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढत असतात. त्यामुळं ते माध्यमांचे, विशेषतः सोशल मीडियाचे डार्लिंग आहेत. परंतु केवळ संघर्ष करून प्रतिष्ठा मिळत नसते. त्यासाठी सार्वजनिक व्यवहारातल्या चारित्र्याची जोड असावी लागते. ती नसेल तर संघर्षाला नुसतंच आदळ आपटीचं स्वरुप येतं. त्यातून तुमचं वैफल्य दिसून येतं. त्याच्या बातम्या तर येत असतात. पण त्यापलीकडं त्याला महत्त्व नसतं. या दोघांचं नेमकं काय चुकलंय आणि ते दुरुस्त करण्याची क्षमता त्यांच्याकडं आहे का? (Bachhu Kadu and Dhangekar)

`आमदाराला कापा` मुळे वाद

बुलढाणा जिल्ह्यातल्या पातुर्डा येथे शेतकरी हक्क परिषद झाली. त्यात बच्चू कडू शेतक-यांच्या आत्महत्यांबद्दल तळमळीनं बोलले. त्यावेळी ते म्हणाले की, आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा. त्यांच्या या विधानावरून बराच गदारोळ उठला. सत्ताधारी, विरोधी पक्षातल्या अशा सगळ्याच नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.(Bachhu Kadu and Dhangekar)

अमरावतीमध्ये त्यांचा रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याविरोधात सतत संघर्ष सुरूच असतो. त्यांच्यावर त्यांनी शाब्दिक हल्ला केला आहे. तुम्ही राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात. पण बायको भाजपमध्ये आणि नवरा युवा स्वाभिमान मध्ये हे कशासाठी याचे स्पष्टीकरण आधी तुम्ही द्या. याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही एवढी नाचक्की यांच्यावर येत असेल तर अधिक काय बोलावे, असा टोला बच्चू कडू यांनी रवी राणा यांना लगावलाय. (Bachhu Kadu and Dhangekar)

बच्चू कडू मरेपर्यंत आणि मेल्यावर कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होणार नाही. जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर. ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या मोदींना शिव्या दिल्या त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या. हा कार्यक्रम त्यांना देवेंद्र फडणीस यांनी दिला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

धंगेकरांची मोहोळांविरुद्ध मोहीम

रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. पुण्यातल्या जैन वसतिगृहाच्या जागेच्या खरेदी व्यवहारामुळं मोहोळ चर्चेत आले आहेत. या प्रकरणात धंगेकर यांचा तसा थेट संबंध नव्हता. जैन समाजानं मोर्चा काढला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चात सहभाग घेतला आणि मोहोळ, फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. हे प्रकरण स्थानिक पातळीवर धंगेकर लावून धरत आहेत. मोहोळ जमीनचोर निघाले असल्याची जिव्हारी लागणारी टीका त्यांनी केली. मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.

एरव्ही धंगेकरांच्या या आरोपांना फार महत्त्व मिळालं नसतं. पण ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. महायुतीतल्या नेत्यावर, तेही केंद्रीय मंत्र्यावर ते थेट आरोप करीत आहेत. त्यामुळे महायुतीतला संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. धंगेकर यांना एकदा एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. पण खरंच सबुरीचा सल्ला दिला, की लगे रहो म्हणून पाठीवर थाप दिली, याबाबत संशय आहे. (Bachhu Kadu and Dhangekar)

आता या दोघांचाही प्रॉब्लेम काय झालाय,…. तर दोघे कितीही संघर्षाचा आव आणत असले, तरी ते संधिसाधू असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. त्यांचा राजकीय प्रवास संधिसाधूपणाचा आहे, त्यामुळे त्यांचा हा संघर्ष लोकांना अपील होताना दिसत नाही. (Kadu Dhangekar’s problem)

गुवाहाटीमुळे बच्चू कडू बदनाम

अचलपूर मतदारसंघाचे आमदार असलेले मूळचे शिवसैनिक बच्चू कडू आपल्या डॅशिंगकार्यशैलीमुळे महाराष्ट्राचे लाडके नेते बनले. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधा-यांचे हस्तक असल्याप्रमाणे काम करू लागले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्याकडे संशयाने पाहू लागला आहे. गुवाहाटीपासून सुरू झालेली त्यांची घसरण एकनाथ शिंदेपुरस्कृत उपोषणापर्यंत येऊन पोहोचल्याची टीका त्यांच्यावर झाली.

महाराष्ट्र एका विचित्र परिस्थितीत सापडला आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आहे. म्हणजे इथले सरकारही भाजप चालवत आहे आणि इथल्या विरोधी पक्षांची जागा भरण्याचं कामसुद्धा भाजपच करीत आहे. दरवेळी नवनवे लोक उभे केले जातात. त्यांना आंदोलनासाठी फूस दिली जाते. किंवा एखादे आंदोलन उभे राहिल्यास त्यात आपले लोक घुसवून ते आंदोलन हायजॅक केले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहातून शह-काटशहाचे राजकारण खेळले जाते. मनोज जरांगे यांच्यापासून बच्चू कडू यांच्यापर्यंतच्या आंदोलनात ते दिसून आले. (Bachhu Kadu and Dhangekar)

मोझरी उपोषणामुळे चर्चेत

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, अपंगांची मानधनवाढ यासह विविध मागण्यांसाठी जून महिन्यात अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपोषण केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलणे घडवून आणल्यानंतर त्यांचे उपोषण संपले नव्हते. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले. बच्चू कडू यांचे हे आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उभे केल्याचे सांगण्यात येत होते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी बच्चू कडू यांना अशा एका व्यापक प्रसिद्धी देणा-या आंदोलनाची गरज होती, ती यानिमित्ताने पूर्ण झाली होती.

अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक तोंडावर आहे. त्या निवडणुकीच्यादृष्टिने बच्चू कडू यांनी तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येते. बच्चू कडू यांनी आपली प्रतिमा सर्वसामान्यांसाठी दीनदुबळ्यांसाठी लढणारा नेता अशी जाणीवपूर्वक तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा कायदा हातात घेऊन आक्रमकपणा दाखवला आहे. सरकारी कर्मचा-यांवर अनेकदा हाच उचलला आहे.

शेतकरी दारू पितात, कर्ज काढून लग्न करतात त्यामुळे आत्महत्या करतात, असे विधान सत्ताधाही पक्षाच्या एका नेत्याने केले होते. त्यावर बच्चू कडू म्हणाले होते, ७५ टक्के खासदार, आमदार, पत्रकार दारू पितात.इतकंच काय हेमा मालिनी सुद्धा रोज दारू पिते, मग ते आत्महत्या करतात का? नितीन गडकरी यांनी कोट्यवधी खर्च करून मुलाचे लग्न केले, ते आत्महत्या करतात का बघूया… असे वक्तव्य केले होते. त्यावेळी हेमा मालिनी यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. (Bachhu Kadu and Dhangekar)

सरकारी यंत्रणेविरुद्ध असंतोष

वेगवेगळ्या कारणांनी ते सतत वादग्रस्त ठरतात, त्याचमुळे चर्चेत ठरतात. मात्र जी सरकारी यंत्रणा सामान्य माणसांना वेठीस धरते त्या यंत्रणेसंदर्भात बच्चू कडू आक्रमक वागत असल्यामुळे त्यांच्या कृतीचे सामान्य माणसांकडून स्वागत होत असते. तर असे हे बच्चू कडू नेमके कोणाचे? देवेंद्र फडणवीस यांचे की एकनाथ शिंदे यांचे की शरद पवार यांचे? होय शरद पवार यांचा उल्लेखही आवश्यक आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे संबध आहेत, तसाच शरद पवार यांच्याशीही त्यांचा उत्तम संवाद आहे. पण बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते, ते देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवर. त्याचमुळे त्यांच्यासंदर्भात अनेकांचा गोंधळ होतो.

एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि सूरतमार्गे गुवाहाटी गाठले. बच्चू कडूही त्यांच्यापाठोपाठ गुवाहाटीला रवाना झाले. खरेतर ते अपक्ष होते. त्यांनी तिकडे जाण्याची गरज नव्हती पण ते गेले. त्यामुळे पन्नास खोके एकदम ओकेवाल्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही विविध कारणांनी ते चर्चेत होते. परंतु अस्वस्थ होते. सलग वीस वर्षे आमदार, त्यातही चर्चेत राहण्याची सवय लागल्यामुळे अस्वस्थता येणे स्वाभाविक होते. त्यातूनच त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उपोषण केले. बच्चू कडू सतत कार्यरत असतात. सामाजिक, राजकीय पातळीवर सक्रीय असतात. माध्यमांमध्ये चमकत असतात. (Kadu Dhangekar’s problem)

धंगेकरांना शिवसेनेची अडचण

रवींद्र धंगेकर मनसेमधून काँग्रेसमध्ये आले. नगरसेवकाचा थेट आमदार झाला. पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले. त्या बळावर त्यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली. लोकसभेला मुरली मोहोळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर धंगेकर बिथरले आणि काँग्रेसमधून थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. तिथंच धंगेकरांचा डाव फसला. अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी त्यांना चांगली बक्षिसी मिळाली असेल. पण बक्षिसीच्या नादात त्यांनी प्रतिष्ठा गमावली. (Bachhu Kadu and Dhangekar)

आपल्या स्वभावानुसार ते सतत काही आंदोलनं करीत असतात. त्यांना त्या त्या वेळी प्रसिद्धी मिळत असते. गुंड नीलेश घायवळप्रकरणी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील आरोप असो, किंवा आता मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधातील मोहीम. धंगेकर संघर्ष करताहेत. व्यवस्थेविरुद्ध लढणारे धंगेकर व्यवस्थेचा भाग बनतात आणि तेव्हा त्यांचे लढणे नाटक वाटते. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना हे करणं भाग आहे. परंतु त्यांच्या या धडपडीला नैतिक अधिष्ठान राहिलेलं नाही. धंगेकर यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही गोष्ट लक्षात येत असेल की नाही ठाऊक नाही. (Bachhu Kadu and Dhangekar)

धंगेकरांचे नियंत्रण मुख्यमंत्र्यांकडे

आपल्या बातम्या छापून येतात. टीव्हीवर दिसतो म्हणजे आपलं नीट चाललंय असा त्यांचा समज असू शकतो. परंतु काँग्रेसमध्ये असताना लढणा-या फाटक्या धंगेकरांना जी प्रतिष्ठा होती, त्याच्या चारआणेसुद्धा प्रतिष्ठा त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून लढताना मिळत नाही. ही खरी गोम आहे. आणि शेवटी कधीतरी डोक्यावरून पाणी जाईल तेव्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचीच कळ दाबतील. तेव्हा धंगेकरांपुढे दोन पर्याय उरतील. गप्प राहणे किंवा पक्ष बदलणे. अर्थात एकेवेळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाव घुसडणा-या मुरलीधर मोहोळ यांचा परस्पर कार्यक्रम होत असेल तर फडणवीस यांना ते हवेच असेल. पण त्याचा फटका पक्षाला बसतोय आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नुकसानकारक ठरू शकते, एवढे फडणवीस यांना कळते. त्यामुळे कधीतरी त्यांना धंगेकरांचे तोंड बंद करावे लागणार आहे.

राजू शेट्टी यांचे उदाहरण

बच्चू कडू किंवा धंगेकर या दोघांपुढेही राजू शेट्टी यांचे उदाहरण आहे. २०१४ साली राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याची चूक केली. ती लक्षात आल्यावर बाहेर पडून त्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली. त्यानंतर दहा वर्षे ते भाजपविरोधात आक्रमक लढताहेत. तरीसुद्धा त्यांच्याभोवतीचे संशयाचे धुके दूर होत नाही. त्यांच्याकडे संशयानेच पाहिले जाते. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवर गुवाहाटीला जाणारे बच्चू कडू यांना कशी विश्वासार्हता मिळेल? त्यांना आधी आत्मक्लेश करून घ्यावा लागेल. आणि धंगेकर तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. त्या पक्षाची समाजातील प्रतिमा काय आहे, हे धंगेकरांनी जरा आपल्या वॉर्डाच्या बाहेर डोकावून पाहावे. (Bachhu Kadu and Dhangekar)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक