३७० कलम पुन्हा लागू अशक्य : गृहमंत्री शाह

शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी ते बोलत होते. शाह यांच्या इचलकरंजी, कराड, सांगली येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्र सोडले. गृहमंत्री शाह म्हणाले, ‘नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात आहे. राज्यातही महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणा. हे डब्बल इंजिनचे सरकार राज्याला एक नंबरचे राज्य बनविल्याशिवाय राहणार नाही.

महायुती सरकारने औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ केले. परंतु वोट बैंक जपण्यासाठी महाविकास आघाडीने ‘संभाजीनगर’ या नावास विरोध केला. शरद पवार यांनी कितीही प्रयत्न केले तरी संभाजीनगरचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’च राहणार आहे. ५०० वर्षांपासून प्रभू श्रीराम तंबूमध्ये होते. नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत प्रभू श्रीराम मंदिराची स्थापन करून श्री रामाची प्रतिष्ठापना केली. महाविकास आघाडीला वोट बँकेची भीती आहे. महायुती वोट बँकेला भित  नाही.

शिराळा येथील प्रसिद्ध नागपंचमी वोट बँकेमुळेच बंद झाली आहे. शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर संभाजी महाराजांना सोडवण्याचा अंतिम प्रयत्न झाला होता. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी १३ कोटी मंजूर केले आहेत. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे या भुईकोट किल्ल्यावर राष्ट्रीय स्मारक उभारले जाईल. शिराळा येथील औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण करून मोठे उद्योग-धंदे आणणार आहोत. शरद पवार यांच्या महाविकास आघाडीचे सरकार २००४ पासून २०१४ पर्यंत होते. त्याकाळात आघाडी सरकारने केंद्र सरकारकडून १० वर्षात १ लाख ९१ हजार करोड आणले.

तर नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी १० लाख १५ कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना सक्षम बनवले. सध्या आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओड सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे मुलाला मुख्यमंत्री करणार म्हणतायेत, तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे डझनभर नेते तर नवीन  कपडे शिवून तयारीत आहेत. सत्यजितला तुम्ही आमदार करा त्यांना मोठे करण्याचे काम भाजप करेल. सत्यजित देशमुख व निशिकांत पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून मोदींचे हात बळकट करा.

सत्यजित देशमुख यांनी बहुतांशी भाषण हिंदीतून केले व ते म्हणाले, ‘शिराळा येथे साकारत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज  यांच्या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळावा याबरोबरच शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी पूर्ववत व पारंपरिक परंपरेनुसार सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी. मला यावेळी एक वेळेस संधी द्या मी तुमची पाच वर्षे सेवा करीन. खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘एखादा निवडणुकीसाठी देशाचा गृहमंत्री पहिल्यांदाच शिराळ्यामध्ये  येत आहे. पंतप्रधानानंतर त्यांचे दुसरे स्थान मंत्रिमंडळात आहे. सत्यजित भाऊ थोडे लेट पण तुम्हाला सर्व थेट मिळत आहे. केंद्रात जे निर्णय होतात ते राज्यात येण्यासाठी आपल्या विचाराचा आमदार येथे पाहिजे कारण इथले आमदार दोन्हीकडे डोळा मारत असतात. त्यांची डबल ढोलकी यापुढे चालणार नाही.

आपल्या विचाराचा आमदार इथे निवडून आला पाहिजे. आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, राष्ट्रवादीच्या शासनाने स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांना सभापतिपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले याचा बदला घेण्यासाठी सत्यजित भाऊंना आपल्याला आमदार करावे लागेल. सत्यजितभाऊंची उमेदवारी म्हणजे प्रस्थापित विरोधात विस्थापित अशी आहे. यावेळी सम्राट महाडिक, राहुल महाडिक, मकरंद देशपांडे, निशिकांत पाटील, सुखदेव पाटील, प्रमुख उपस्थित होते

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी