ऑबर्नडेल : तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-१च्या अखेरच्या दिवशी भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने रौप्यपदकाची कमाई केली. भारतीय पुरुष संघामध्ये अतनू दास, धीरज बोम्मदेवरा आणि तरुणदीप राय यांचा समावेश होता. याबरोबरच, भारताने या स्पर्धेमध्ये एकूण एक सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझ अशा एकूण चार पदकांवर नाव कोरले. गुणतक्त्यात भारत चौथ्या स्थानी राहिला. (Archery Silver)
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ऑबर्नडेल येथे ही स्पर्धा रंगली. पुरुष सांघिक रिकर्व्ह गटात भारताने स्पेनवर ६-२ अशी मात करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम लढतीत मात्र भारतीय तिरंदाजांना चीनविरुद्ध १-५ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, भारताने प्राथमिक फेरीत ब्राझीलचा ६-२ असा पराभव केला होता, तर उपांत्यपूर्व फेरीमध्ये चतुर्थ मानांकित इंडोनेशियाचे आव्हानही ६-२ असे मोडून काढत उपांत्य फेरी गाठली होती. या गटात चीनने सुवर्णपदक पटकावले, तर तैपेईचा संघ ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. (Archery Silver)
या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या धीरज बोम्मदेवराने रिकर्व्ह प्रकारातील पुरुष एकेरी गटात ब्राँझपदकाची कमाई केली. ब्राँझपदकाच्या लढतीत त्याने स्पेनच्या आंद्रेस तेमिनोला ६-४ असे पराभूत केले. या लढतीत एकावेळी धीरज २-४ असा पिछाडीवर होता. मात्र, निर्णायक क्षणी खेळ उंचावून त्याने ही पिछाडी भरून काढली आणि विजय निश्चित केला. भारताची स्पर्धेतील अन्य दोन पदके ही कम्पाउंड प्रकारातून आली. कम्पाउंडच्या मिश्र गटात ज्योती सुरेखा वेन्नम-रिषभ पंत या भारतीय जोडीने सुवर्णपदकावर नाव कोरले. कम्पाउंड पुरुष सांघिक गटात रिषभ, अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाने ब्राँझपदक जिंकले. (Archery Silver)
दरम्यान, रिकर्व्ह प्रकारातील महिला गटात भारताच्या हाती निराशा आली. भारताची चारवेळची ऑलिंपियन तिरंदाज दीपिका कुमारीला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या कॅसी कॉफहोल्डकडून २-६ असा पराभव पत्करावा लागला. दीपिका, अंकिता भगत आणि अंशिका कुमारी यांना महिला सांघिक गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या संघाने भारतीय महिला संघास ६-२ असे हरवले. या स्पर्धेत मेक्सिकोचा संघ एकूण सहा पदकांसह गुणतक्त्यात अग्रस्थानी राहिला. (Archery Silver)
हेही वाचा :
भारताला तिरंदाजीत सुवर्ण
ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रेला संधी
बेंगळुरू पुन्हा विजयपथावर