सेंट्रल फ्लोरिडा : भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि रिषभ यादव यांनी तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-१मध्ये
कम्पाउंड मिश्र गटात सुवर्णपदक जिंकले. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये कम्पाउंड तिरंदाजीच्या
समावेशावर शिक्कामोर्तब झाल्याच्या काही दिवसांमध्येच भारताच्या मिश्र संघाने सुवर्णपदक जिंकून आपली दावेदारी
सांगितली. (Archery Gold)
अमेरिकेतील सेंट्रल फ्लोरिडा येथे हा वर्ल्ड कप रंगला. मिश्र गटाच्या अंतिम सामन्यात ज्योती-रिषभ जोडीने
तैपेईच्या हुआंग ई-जोऊ व चेन चिए-लून या जोडीचा चुरशीच्या सामन्यात १५३-१५१ असा पराभव केला. यापूर्वी,
मागील वर्षी शांघायमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्टेज-१मध्येही भारताने मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले होते.
त्यावेळी अभिषेक वर्मा हा ज्योतीचा साथीदार होता. यावेळी तिने रिषभच्या साथीने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती
केली. (Archery Gold)
या स्पर्धेत ज्योती-रिषभ जोडीला पाचवे मानांकन होते. पात्रता फेरीमध्ये त्यांनी स्पेनचा १५६-१४९ असा, तर
उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कचा १५६-१५४ असा पराभव केला होता. उपांत्य फेरीत स्लोव्हेनियाच्या जोडीवर मात करून
त्यांनी अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीतील पहिल्या दोन सेटमध्ये भारतीय जोडी ३७-३८ आणि ३८-३९ अशी
पिछाडीवर पडली होती. परंतु, त्यानंतर जोरदार पुनरागमन करत ज्योती-रिषभ यांनी सलग दोन सेट अधिक
फरकाने जिंकून विजय निश्चित केला. तिसऱ्या सेटमध्ये दोनवेळा दहा गुणांचा, तर एकदा ‘इनर-१०’चा वेध घेत
ज्योती-रिषभ यांनी ३९-३८ अशी आघाडी घेतली. चौथ्या व निर्णायक सेटमध्ये भारतीय जोडीने ३९-३६ अशी सरशी
साधून १५३-१५१ आघाडीसह विजयावर शिक्कामोर्तब केले. (Archery Gold)
तत्पूर्वी, या स्पर्धेमध्ये कम्पाउंड पुरुष गटामध्ये भारतीय संघाने ब्राँझपदकावर नाव कोरले. भारताच्या संघात रिषभ
यादव, ओजस देवतळे आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश होता.
हेही वाचा :