मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना ‘अंनिस’चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ मुंबई येथील पीपल सायन्स नेटवर्क इंडियाचे समन्वयक डॉ. विवेक मोन्टेरो (मुंबई) तर आठल्ये पुरस्कार प्राचार्य डी. एच. थोरात (अंबाजोगाई) यांना जाहीर करण्यात आला आहे. (ANIS awards declared)
देवयानी भगत (नागपूर), सुनीता भोसले (शिरूर), कमलाकर जमदडे (बिलोली) यांचाही विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
मुंबई येथील पीपल सायन्स नेटवर्क इंडियाचे समन्वयक डॉ. विवेक मोन्टेरो यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन देशभर ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. ते सीटू या ट्रेड युनियनमध्येही सक्रिय आहेत. (ANIS awards declared)
अंबाजोगाई अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य डी. एच. थोरात यांना ‘सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
‘सावित्रीमाई फुले महिला प्रेरणा पुरस्कार’ नागपूर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या देवयानी भगत यांना देण्यात येत आहे.
भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील अघोरी प्रथा, चाली-रीती याविषयी प्रबोधनकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘‘प्रबोधन पुरस्कार’’ देऊन सन्मान केला जातो. यावर्षी हा पुरस्कार फासेपारधी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले यांना देण्यात येणार आहे.
‘सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार’ बिलोली अंनिसचे सक्रिय कार्यकर्ते कमलाकर जमदडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. (ANIS awards declared)
१४ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण
या सर्व पुरस्काराचे वितरण लातूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत होणार आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते रविवारी (१४ सप्टेंबर) हा कार्यक्रम होणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये दहा हजार आणि मानपत्र असे आहे.
तसेच यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या आधारस्तंभ, शतकवीर आणि ग्रंथमित्र पुरस्कारांचे वितरण पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे गणेश चिंचोले हे असणार आहेत.