अजित पवार शपथ घेणार, एकनाथ शिंदे काय करणार?

महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे जाहीर केले तर, एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही हे स्पष्ट न करता थोडी कळ काढा, संध्याकाळी सर्व काही स्पष्ट होईल असं सांगत सस्पेन्स वाढवला आहे. (Eknath Shinde)

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर राज्यपालांनी गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताचे सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. या भेटीनंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद पार झाली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात सहभाग असणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

कारण, एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे, अशी विनंती केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मी स्वत: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तुम्ही स्वत: या सरकारमध्ये आमच्यासोबत राहायला हवे, अशी विनंती मी एकनाथ शिंदे यांना केली आहे. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावे, अशी शिवसेनेच्या आणि महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्या सरकारमध्ये असतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Eknath Shinde)

यावर एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं असून तुम्ही जरा दम काढा. जे काही आहे ते संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. कोण शपथ घेणार?, कोण शपथ घेणार नाही? हे सर्व काही सांगितलं जाईल. मी मंत्रिमंडळात असावे असे सर्वांना वाटते. मी सर्वांचा मान राखतो, आदर करतो. पण मंत्रिमंडळात जायचे की, नाही याचा निर्णय आपण संध्याकाळपर्यंत नक्की घेवू,असे सांगत शिंदेंनी आपल्या सहभागाबाबत सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शपथ घेणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे तळ्यात मळ्यात सुरु असतांनाच अजित पवार यांनी मात्र आपण शपथ घेणार आहोत, असं जाहीर केलं आहे.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ