ही एक अशी लव्ह स्टोरी आहे ज्यामध्ये तमिळनाडूच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना अटक झाली. आणि एका आमदाराला कोर्टाचे फटके खावे लागले.(ADJP Jayram)
तर प्रकरण असं आहे. लक्ष्मी नावाच्या एका महिलेनं तक्रार केली. त्यानुसार तिच्या मोठ्या मुलाचं थेनी जिल्ह्यातील एका मुलीवर प्रेम होतं. दोघांनी लग्नही केलं. परंतु मुलीच्या वडिलांना, वनराजा यांना, हे लग्न मान्य नव्हतं. त्यांना कोणत्याही परिस्थितीत हे लग्न मोडायचं होतं. त्यांच्या भीतीनं मुलगा आणि मुलगी गायब झाले होते. (ADJP Jayram)
दरम्यान, आपल्या मुलीला परत आणण्यासाठी अस्वस्थ असलेल्या वनराजा यांनी एक माजी महिला कॉन्स्टेबल माहेश्वरी यांच्याकडे मदत मागितली. हे प्रकरण घेऊन माहेश्वरी तमिळनाडूच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) एचएम जयराम यांच्याकडे गेल्या. तिथून हे प्रकरण ‘पुरैची भारतम पार्टी’चे आमदार पूवई एम जगन मूर्ति यांच्याकडे गेलं. त्यानंतर आमदाराचे लोक प्रेमी जोडप्याचा शोध घेण्यासाठी लक्ष्मीच्या घरी पोहोचले. पण दोघंही घरी सापडले नाहीत. म्हणून त्यांनी मुलाच्या अल्पवयीन धाकट्या भावाचं, म्हणजेच लक्ष्मीच्या सोळा वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं. (ADJP Jayram)
लक्ष्मीने पोलिसांत तक्रार केली, तेव्हा अपहरणकर्त्यांनी त्या मुलाला जखमी अवस्थेत बसस्थानकाजवळ सोडले. नंतर असा दावा करण्यात आला की ज्या गाडीतून अल्पवयीन मुलाला बसस्थानकावर सोडण्यात आले, ती एडीजीपी जयराम यांची सरकारी गाडी होती. या गाडीत वनराजा आणि माहेश्वरी दोघेही होते, असा आरोप आहे.या प्रकरणात मुलीचे वडिल वनराजा आणि माजी कॉन्स्टेबल माहेश्वरी यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. (ADJP Jayram)
पोलिसांच्या चौकशीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या काही आरोपींनी आमदार मूर्ति यांचाही अपहरणात सहभाग असल्याचं सांगितलं. १५जून रोजी पोलिस आमदारांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. तर तिथं त्यांच्या पक्षाच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. फरारी आमदारांनं याच दरम्यान मद्रास उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयानं आमदार आणि एडीजीपी दोघांनाही सोमवार, १६ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यावेळी न्यायालयाने एडीजीपी जयराम यांना अटक करण्याचे तोंडी आदेश दिले. मात्र, आमदारांना अटकेपासून सूट देण्यात आली, पण न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले. दोन आरोपींनी एडीजीपींविरुद्ध कबुली जबाब दिला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना अटक केले पाहिजे. यानंतर न्यायालयातून बाहेर येताच पोलिसांनी एडीजीपी जयराम यांना अटक केली. या खटल्याची पुढील सुनावणी २६ जूनला होणार आहे.