कोल्हापुरात ७२ टक्के मतदान

कोल्हापूर; प्रतिनिधी : मतदारांनी दाखवलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे आज, बुधवारी जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत अतिशय चुरशीने मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारनंतर वेग पकडत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७.९७ टक्क्यांचा टप्पा गाठला. सायंकाळी सहा वाजता मतदानाचा आकडा ७२ टक्क्यांच्या पुढे पोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी, २३ रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर मतदारांचा कौल महायुतीकडे की महाविकास आघाडीकडे हे स्पष्ट होणार आहे.

आजच्या मतदानाने पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री आमदार विनय कोरे, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, के. पी. पाटील, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, राहूल पाटील, राहूल आवाडे, गणपतराव पाटील, नंदिनी बाभूळकर, शिवाजी पाटील, अप्पी पाटील, राजेश लाटकर, अशोकराव माने या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.

मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. नवमतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांनी उत्साहात मतदान केले. प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा मतदारांचा उत्साह वाखाखण्याजोगा होता. तरुणांनाही लाजवेल अशा ८५  वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ मतदारांचा  उत्साह दांडगा होता.  जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर येऊन मतदान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  कसबा बावडा, सदर बाजार, पुलाची शिरोली, कागलमध्ये काही ठिकाणी तणावाचे प्रसंग निर्माण झाले. त्या ठिकाणी पोलिस आणि राजकीय नेत्यांनी वाद शमवण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९.५३ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा आकडा झपाट्याने वाढू लागला. शहरी आणि ग्रामीण भागात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत होते. उमेदवार प्रत्येक मतदारसंघ आणि गावांना भेटी देऊन मतदानाचा कानोसा घेत होते. उमेदवारांचे सर्व कुटुंबीय मतदारसंघातून फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. मतदान केंद्रावर नवमतदारांकडून सेल्फी काढून तो शेअर करण्याकडे ओढा होता. थिमॅटिक मतदान केंद्रावर सर्व वयोगटातील मतदार मोबाईलवर फोटो घेत होते. मोबाईल घेऊन जाण्यास मतदान केंद्रावर बंदी असल्याने अनेक मतदारांची अडचण झाली होती, पण यावेळी पोलिस यंत्रणेने मोबाईल वापरण्यास मज्जाव केल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात सकाळी अकरा वाजता २०.५९, तर एक वाजता ३६.५६ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढू लागला. दुपार असूनही मतदान केंद्रांवर रांगा होत्या. तीन वाजता मतदानाने निम्मा टप्पा गाठत ५४,०६ टक्केपर्यंत मजल मारली. तीन वाजता शाहूवाडी मतदारसंघात सर्वाधिक ६१.७० टक्के मतदान झाले.  दुपारी तीननंतर कागल, शाहूवाडी, कोल्हापूर दक्षिण, चंदगड, राधानगरी, करवीर मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यात ६७.९७ टक्के मतदान झाले. कागल मतदारसंघात ७४.३३ टक्के मतदानाची नोंद झाली. शेवटच्या तासात शिल्लक मतदान शोधण्यासाठी यंत्रणा लावण्यात आली. सहा वाजता मतदान संपण्यापूर्वी काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यांना मतदान करू देण्यात आले.

१४३ थिमॅटिक मतदान केंद्रावर

जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण संकल्पानांवर आधारित १४३ थिमॅटिक मतदान केंद्रे  उभारण्यात आली आहेत. ही मतदान केंद्रे पाहण्यासाठी व येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक व मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्रांवर लावण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे घेण्यासाठी तरुणांसह वयोवृद्ध मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळे याच्या कांबळवाडी गावात स्वप्नीलच्या ऑलिंपक यशाचे पोस्टर लावून केंद्र  सजवण्यात आले होते. अनेक मतदान केंद्रांवर रांगोळ्या घालण्यात आल्या होता. लेक वाचवा, प्लास्टिक बंदी, मोबालचे दुष्परिरणाम, प्रदूषण, कोल्हापूरची वैशिष्ट्ये असलेल्या गूळ, कोल्हापूर चप्पल, मधाचे गाव अशी थिमॅटिक केंद्रे उभारण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दत्ताबाळ विद्यामंदिर या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के यांनी वाठार तर्फ वडगाव येथे मतदान केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी कसबा बावडा येथील भाऊसो महागावकर विद्यामंदिर येथे मतदान केले. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दोन मतदान केंद्रांत बिघाड

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विक्रमनगर हायस्कूल येथे सकाळी साडेसात वाजता व्हीव्हीपॅट बंद पडले. त्यानंतर ते बदलण्यात आले आणि मतदानास सुरुवात झाली. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नेहरूनगर येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम मशिनचे बटण खराब झाल्याने मतदान थांबवण्यात आले. अर्धा तासानंतर मशीन बदलण्यात आले. त्यावेळी मतदान केंद्रांच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. मतदारांनी घरी न जाता रांगेत थांबून उशीर झाला असतानाही मतदानाचा हक्क बजावला.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी