कोल्हापूर; प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात यश किरण दाभाडे या १९ वर्षीय युवकाचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून केला. पोलिसांनी या गुन्ह्यातील हर्षद दीपक दाभाडे (वय १९, रा. माळवाडी अंबप, ता. हातकणंगले), शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला (१९, रा. राजे गल्ली, आनंदनगर, कोडोली, ता. पन्हाळा) या दोन आरोपीसह एका १८ वर्षापेक्षा कमी असलेल्या विधीसंघर्ष बालकाला अटक केली आहे. खूनानंतर संशयितांनी सोशल मिडियावर ‘तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे’ # ३०२ अशी पोस्ट करुन अंबप परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात पुढे आले आहे.
वडगांव पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. काल (दि.२) रात्री अंबप गावातील पाण्याच्या टाकीजवळ मोटार सायकलवरुन आलेल्या तिघांनी एडक्यासारख्या हत्याराने वार करुन यश किरण दाभाडे याचा निर्घुन खून केला. यश दाभाडे याने हर्षद दाभाडे याला एक वर्षापूर्वी मारहाण केली होती. यश दाभाडेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पण, त्याचे वय कमी असल्याने विधीसंघर्ष बालक म्हणून त्याला बालसुधारणागृहात ठेवले होते. बालसुधारणागृहातून सुटल्यावर यश दाभाडे आणि हर्षद दाभाडे यांच्यात किरकोळ वाद होत होते. याच कारणावरुन सोमवारी सायंकाळी हर्षद दाभाडे आणि त्यांच्या दोन मित्रांनी यश दाभाडेचा खून केला.
खून केल्यानंतर हर्षद दाभाडे याने सोशल मिडियावर ‘तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे #३०२’ अशी पोस्ट केली होती. त्यामुळे अंबप परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. या गुन्ह्याचा तपास वडगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करुन संशयितांचा शोध घेत असताना एलसीबीतील पोलिस हवालदार हिंदूराव केसरे यांना संशयित हर्षद दाभाडे आणि त्याचे साथीदार कोडोली येथील विजय चौकात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हर्षदसह शफीक मुल्ला, आणि एका विधीसंघर्ष बालकाला अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयितांनी खून केल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मसगुटे, पोलिस उप निरीक्षक शेष मोरे, पोलिस हवालदार हिंदूराव केसरे, युवराज पाटील, समीर कांबळे, शिवानंद मठपती, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संजय पडवळ, विनोद चौगुले, कृष्णात पिंगळे, विनोद कांबळे, यशवंत कुंभार, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे यांनी तपास केला.