नव्या शतकाचा विजेता

 इटलीचा युवा टेनिसपटू यानिक सिनरने रविवारी एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून आजवरच्या कारकिर्दीतील सर्वांत यशस्वी वर्षाची साजेशी सांगता केली. ज्याप्रमाणे सिनर ही स्पर्धा जिंकणारा इटलीचा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला, त्याचप्रमाणे नव्या सहस्रकामध्ये जन्मलेलाही तो या स्पर्धेचा पहिलाच विजेता ठरला. जागतिक टेनिस एका पिढीकडून पुढील पिढीकडे प्रवाहित होत असल्याचे हे द्योतक समजले जावे.

इटलीतील इनिकेन शहरात १६ ऑगस्ट २००१ रोजी जन्मलेल्या सिनरने वयाच्या तिसऱ्या वर्षी टेनिसची रॅकेट हातात धरली. त्याच बरोबरीने तो स्कीईंगही खेळत होता. सात ते बारा वर्षे वयादरम्यान तो इटलीच्या आघाडीच्या स्कीईंगपटूंपैकी एक होता. तथापि, सडपातळ शरीरयष्टी आणि त्यावेळी केवळ ३५ किलो वजन असल्यामुळे त्याने स्कीईंग सोडून टेनिसवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. ज्युनिअर टेनिसमध्ये फारसे यश हाती न लागूनही सिनरने २०१७ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण करायचे ठरवले. दोन वर्षांनंतर २०१९ मध्ये तो पहिली एटीपी चॅलेंजर स्पर्धा जिंकला, त्यावेळी त्याचे वय होते १७ वर्षे ६ महिने. २०१९ साली तो एटीपीचा सर्वोत्कृष्ट नवोदित खेळाडू ठरला होता.

व्यावसायिक टेनिसपटू बनल्यानंतरही सिनरला पहिल्या तीन वर्षांमध्ये विशेष यश हाती लागले नाही, परंतु त्याने प्रयत्न न सोडता अन्य स्पर्धांमध्ये यश मिळवत क्रमवारीतील आगेकूच कायम ठेवली. २०२२ मध्ये सिनरने चारपैकी तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून जागतिक क्रमवारीत पंधराव्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. २०२३ या वर्षी त्याने विम्बल्डनची उपांत्य फेरी तर गाठलीच, पण त्याचबरोबर इटलीने पटकावलेल्या डेव्हिस कप विजेतेपदामध्येही त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये त्याने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचवर मात केली होती आणि २०११ नंतर डेव्हिस कपमध्ये जोकोविचला पराभूत करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. याची परतफेड जोकोविचने एटीपी फायनल्सच्या अंतिम सामन्यात केली आणि सिनरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्या वर्षी एटीपी पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘मोस्ट इंम्प्रुव्ह्ड प्लेअर’ आणि ‘फॅन्स फेव्हरेट प्लेअर’ या दोन पुरस्कारांचा तो मानकरी ठरला.

सिनरसाठी २०२४ हे कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वपूर्ण ठरले. या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा एकाच वर्षी जिंकणारा तो सर्वांत तरुण टेनिसपटू ठरला, तर जून २०२४ मध्ये त्याने एटीपी क्रमवारीत अग्रस्थानही पटकावले. आणि आता मागील वर्षी हुकलेले एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावून त्याने वर्षाचा शेवट गोड केला. एकीकडे स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफाएल नदाल या वर्षाअखेरीस निवृत्त होत असून २४ ग्रँड स्लॅम जिंकणारा जोकोविचही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. अशावेळी या वर्षी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि एटीपी फायनल्स जिंकणारे टेनिसपटू हे एकविसाव्या शतकात जन्मलेले आहेत. (२०२४ मधील विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन या उर्वरित दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा स्पेनचा कार्लोस अल्कारेझचा जन्म २००३ चा आहे.) जागतिक पुरुष टेनिसमध्ये पिढीबदलाचे हे स्पष्ट संकेत असून, येणाऱ्या दशकभरात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर याच टेनिसपटूंचे वर्चस्व राहणार आहे. या खेळाडूंमध्ये सिनर आघाडीवर असल्याची दवंडी २०२४ मधील त्याच्या कामगिरीने पिटली आहे.

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम