का? …  कशासाठी? …अशा अनेक प्रश्नांचे ‘प्रश्नचिन्ह’

-प्रा. प्रशांत नागावकर

१९६० नंतर प्रायोगिक नाटकांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर झाली. हीच रंगभूमी आता मध्यवर्ती रंगभूमी आहे, अशीही जाणीव निर्माण झाली आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला १९६० ते १९९० या काळातील प्रायोगिक रंगभूमीने नव्याने उभारी दिली. हा तीन दशकांचा काळ मराठी नाटकांचे ‘सुवर्णयुग’ मानावा एवढा समृद्ध झाला आणि विस्तारलाही. महाराष्ट्र राज्याच्या हौशी नाटकांच्या स्पर्धेबरोबरच व्यावसायिक नाटकांच्याही स्पर्धा सुरू असतात. जे नाटक प्रायोगिक म्हणून हौशी रंगभूमीवर सादर झाले तेच प्रायोगिक नाटक व्यावसायिक रंगभूमीच्या स्पर्धेतही सादर झाले आणि त्याला क्रमांकही मिळाला.

तात्पर्य एवढेच की, प्रायोगिक आणि मुख्य प्रवाहातील नाटक यांच्यातील अंतर आता जवळजवळ नाहीसे झाले आहे. पण असे असले तरी प्रायोगिक रंगभूमीचे स्थान नेहमीच दुय्यम स्वरूपाचे राहिले आहे. याचा प्रत्यय पुन्हा आला. निमित्त होतं ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत प्रज्ञान कला अकादमी, वारणानगर या संस्थेने सादर केलेले दिलीप जगताप लिखित  ‘प्रश्नचिन्ह’ हे प्रायोगिक नाटक.

दिलीप जगताप कवी आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटककार म्हणून त्यांचा अत्यंत गौरवाने उल्लेख केला जातो. १९५० नंतरच्या प्रयोगशील रंगभूमीसाठी त्यांच्या नाट्यलेखनाचे योगदान महत्त्वाचे ठरले. ‘आला रे राजा,’ ‘एक अंडं फुटलं,’ ‘जा खेळायला जा,’  ‘पूज्य गुरुजी,’ ‘मेले उंदीर,’ ‘रंगेहात,’ ‘राजदंड,’ ही त्यांची काही महत्त्वाची नाटके. अशा दिग्गज नाटककाराचे नाटक सादर करण्याचा एखादा दिग्दर्शक प्रयत्न करतो त्यावेळी दिलीप जगताप यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, त्यातील आशय याबाबत अतिशय दक्ष राहून कलाकृती सादर करण्याचे आव्हान त्याच्यासमोर उभे असते. दिलीप जगताप यांच्या नाटकातील आशय समजून घेण्याबरोबरच प्रायोगिक नाटकांची वैशिष्ट्ये त्याची बलस्थाने याचीही जाण तितकीच असणे गरजेचे असते. पण याचा अभाव निलेश ढाले आणि अनिकेत आवटी यांच्या दिग्दर्शनात पाहायला मिळाला.

प्रायोगिक रंगमंचावरील नाटक म्हणजे थोडासा विक्षिप्त तसेच विचित्र स्वरूपाचा अभिनय, संवादफेकीतील संथ लय, व्यक्तिरेखांच्या हालचालीतील मरगळ, अनाकलनीय गूढ स्वरूपाचे नेपथ्य, धूसर प्रकाश योजना, इत्यादी समीकरणे रूढ झालेली आहेत. त्याच पद्धतीने प्रायोगिक नाटक सादर केले जाते आणि हेच मुळात चुकीचे आहे. हे अगदी मान्य आहे की, प्रायोगिक रंगभूमीवरील नाटक सादर करण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे आणि ही शैली स्वीकारत असतानाही नाटकातील आशय चांगल्या पद्धतीने कसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याकडे पाहणे तितकेच गरजेचे आहते.  ‘ठोंब्या’सारखं प्रायोगिक रंगभूमीवरील महत्त्वाचं नाटक पण प्रेक्षकांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचले याचे कारण सादरीकरणामधली नाविन्यता आणि आशय पोहोचवणारा अभिनय व दिग्दर्शन.  पण पूर्वग्रह स्वरूपाचे कुठली तरी एक विशिष्ट गोष्ट लक्षात ठेवून प्रायोगिक रंगभूमीचं दिग्दर्शन करणे, त्याचे सादरीकरण करणे हे कोणत्या मानसिकतेचे लक्षण आहे, हे समजत नाही. एक मोठे ‘प्रश्नचिन्ह’ इथेच निर्माण झाला.

‘प्रश्नचिन्ह’ हे नाटकाचे सादरीकरण विशिष्ट मानसिकतेतूनच सादर झाले. मुळात नाटकाचा विषय मानसिकतेशी, त्याला पडणाऱ्या प्रश्नांशी संबंधित आहे. दिग्दर्शक आपल्या मनोगतातून हे स्पष्ट करतो, ‘व्यक्त होण्यासाठी सजीव निर्जीवाला दुसऱ्याची किंवा समूहाची गरज असते.  कारण त्याची उत्पत्ती ही मन आणि मानवी मेंदू यांच्या प्रश्न आणि उत्तराच्या प्रणयातून होत असते. ही एक प्रक्रिया आहे. जी क्रियेतून निर्माण होते ते त्याचे मूळ स्थान आहे. जिथे प्रश्न निर्माण होतात तिथे मन आणि विचार उत्तर शोधण्यासाठी गतिशील आणि स्थिर होतात. हीच अस्थिरता त्याला त्याच्या मनाला जिवंत ठेवण्याचे काम करते. हे सर्व नाटकातून कलाकार लेखक यांच्या सहवासातून प्रेक्षकांनाही प्रश्नचिन्ह म्हणून मिळते.’ नाटकातील विषय जसा क्लिष्ट आहे तसेच दिग्दर्शकीय मनोगतही. हे खरं आहे की, सर्व गोष्टी सोप्या करून सांगण्याचा मक्ता दिग्दर्शकाने घेतलेला नसतो. प्रेक्षकांचीही नाटक समजून घेण्याची जबाबदारी असते. हे मान्य केले तरी दिग्दर्शकालाच नाटकातील आशयाविषयी आकलन पूर्णपणे झाले नसेल तर प्रेक्षकांना तो कितपत सांगू शकतो? हा आणखी एक प्रश्न. यामुळे प्रेक्षक नाटकापासून दुरावला गेल्याचा प्रत्यय आला. या नाटकाबाबतही नाट्यतंत्रे, नाट्याशय, अभिनयाबाबतीत रूढ समजूती, सादरीकरणाच्या ठाम समजुती या सर्वांमधून एक असमाधान प्रेक्षकांना मिळत गेले.

‘प्रश्नचिन्ह’ हे नाटक पाहून झाल्यावर प्रेक्षक तृप्त मनाने नाट्यगृहातून बाहेर पडलेला दिसला नाही. नाट्यप्रयोगाने निर्माण केलेल्या एका विचित्र मानसिक अवस्थेत तो पाहायला मिळाला. ही अस्वस्थता नाट्य आशयामुळे निर्माण झाली असे नव्हे तर नाटकाच्या सादरीकरणामुळे झाली.

प्रायोगिक नाटकाच्या दृष्टीने दिग्दर्शक निलेश ढाले आणि अनिकेत आवटी यांनी जी शैली कलाकारांना दिली त्या कलाकारांनी त्या बरहुकूम आपला अभिनय केला, यात शंका नाही. पण तरीही कलाकारांचा नाटकातील व्यक्तिरेखा समजून घेण्यात एक प्रकारचा कोंडमारा दिसून आला. चोख पाठांतर ही जमेची बाजू असली तरी नाटकाचा आशय पोचवण्यात कलाकारांचा अभिनय पूरक ठरला नाही.

सिद्धी कुलकर्णी, आकाश कदम,  शुभम सुवासे, अंकिता शिर्के यांना आपल्या व्यक्तिरेखा नीटपणे समजल्या नसल्याचे लक्षात येत होते.

तांत्रिक बाबींमध्ये प्रकाश योजना अंधाराला प्राधान्य देणारी होती. धूसर प्रकाश योजना प्रेक्षकांच्या आस्वादात अडथळा निर्माण करत होती. पार्श्वसंगीत नाटकाच्या प्रसंगांशी काहीसे फटकून असल्यासारखेच होते. सूचकात्मक स्वरूपाचे नेमके नेपथ्य रचले गेले होते.

एकूणच नाटक म्हणावा तितका प्रभाव पाडू शकले नाही.

नाटक : प्रश्नचिन्ह

लेखक : दिलीप जगताप

सादरकर्ते : प्रज्ञान कला अकादमी, वारणानगर

दिग्दर्शक : नीलेश आवटी, अनिकेत ढाले

प्रकाश योजना : ऋषिकेश पोवार

संगीत : सौरभ कदम

नेपथ्य : प्रवीण वरेकर

रंगभूषा : नेहा आवटी

वेशभूषा : पार्वती कामी, वर्षा गोंधळी

भूमिका आणि कलावंत

ती : सिद्धी कुलकर्णी

तो : आकाश कदम

रेगे : शुभम सुवासे

मीरा : अंकिता शिर्के

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी