जंगलात राहणारे रेजंट हनीइटर पक्षी स्वतःच “गाण्याचे शिक्षक” बनले आणि पाळीव पक्ष्यांना त्यांनी त्यांचे हरवलेले गाणे पुन्हा शिकवले. हे एखाद्या गोष्टीतले वर्णन वाटेल. त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते खरे आहे. एका नव्या संशोधनात ही गोष्ट आढळून आली आहे.
पूर्वी रेजंट हनीइटर पक्षी ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागातील जंगलांमध्ये मोठ्या थव्यांनी दिसायचे. पण आज हे काळे-पिवळे सुंदर पक्षी अत्यंत संकटात आहेत — फार कमी संख्येने ते उरले आहेत.
गाणेही हरवू लागले.
जसजशी या पक्ष्यांची संख्या कमी झाली, तसतसे त्यांचे खास गाणेही हरवू लागले. नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी हे गाणे गात असतात. संशोधनातील निष्कर्षानुसार काही तरुण पक्ष्यांनी इतर प्रजातींची गाणी शिकायला सुरुवात केली. काहींनी मूळ गाण्याच्या छोट्या आणि सोप्या आवृत्त्या तयार केल्या. आणि प्राणीसंग्रहालयात जन्मलेले पक्ष्यांना तर आपल्या अशा काही गाण्याची खबरबात नव्हती. ते हे गाणे शिकलेच नाहीत. (When birds themselves become teachers and teach other birds to sing)
वैज्ञानिकांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी काही अनुभवी पक्ष्यांना “गाण्याचे शिक्षक” बनवले. या पक्ष्यांनी प्राणीसंग्रहालयात वाढलेल्या लहान पक्ष्यांना मूळ गाणे शिकवले. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात आले. आश्चर्य म्हणजे, या शिकलेल्या पक्ष्यांनी पुढच्या पिढीलाही हे गाणे शिकवायला सुरुवात केली. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, यासंदर्भात अजून संशोधनाची गरज आहे. पण हा उपक्रम यशस्वी ठरला, तर पक्ष्यांच्या प्रजननात वाढ होईल आणि पुन्हा सर्व पक्षी एकाच सुरात गातील. संशोधक डॅनियल अॅपलबी म्हणतात, “हे पारंपरिक गाणे फक्त सुंदर नाही, तर पक्ष्यांच्या प्रजननासाठी खूप महत्त्वाचे आहे.” (When birds themselves become teachers and teach other birds to sing)
प्राण्यांमध्ये संस्कृती असते
या अभ्यासातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली — प्राण्यांमध्येही “संस्कृती” असते. म्हणजेच काही गोष्टी ते एकमेकांकडून शिकतात. उदाहरणार्थ हे गाणे. त्यामुळे संरक्षणासाठी केवळ संख्या वाढवणे पुरेसे नाही, तर त्यांचे वर्तन आणि सवयीही जपाव्या लागतात. गेल्या शतकात जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे या पक्ष्यांची संख्या खूप घटली. आज अंदाजे २५० पक्षीच उरले आहेत, आणि तेही मोठ्या भागात विखुरलेले आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणेही खूप कठीण बनले आहे.
संख्या कमी असल्यामुळे तरुण पक्ष्यांना मोठ्यांकडून गाणे शिकण्याची संधीच कमी मिळाली. कैदेतही अशीच समस्या होती — लहान पक्ष्यांना मोठ्या नर पक्ष्यांशी संपर्क कमी मिळत होता. त्यामुळे जेव्हा हे पक्षी जंगलात सोडले गेले, तेव्हा ते अयोग्य आणि अपूर्ण गाणी गात होते, आणि त्यांना जोडीदार मिळणेही कठीण होत होते. म्हणून वैज्ञानिकांनी प्राणीसंग्रहालयातच त्यांना गाणे शिकवण्याचा प्रयोग केला. सुरुवातीला स्पीकरद्वारे रेकॉर्ड केलेले गाणे वाजवले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतर त्यांनी दोन अनुभवी जंगली नर पक्ष्यांना “शिक्षक” म्हणून वापरले. जेव्हा लहान पक्षी त्यांच्या जवळ राहू लागले, तेव्हा त्यांनी हळूहळू तेच गाणे गाणे सुरू केले. तीन महिन्यांनंतरच योग्य गाण्याचे पहिले स्वर ऐकू येऊ लागले. (When birds themselves become teachers and teach other birds to sing)
एका शिक्षकाकडे पाच विद्यार्थी
वैज्ञानिकांना असेही आढळले की, एका शिक्षकाकडे जास्तीत जास्त पाचच विद्यार्थी असले पाहिजेत. अशा छोट्या गटात शिकलेले पक्षी अगदी मूळ गाण्यासारखेच गात होते. इतकेच नाही, तर पुढच्या वर्षी हेच शिकलेले पक्षी स्वतः शिक्षक बनले आणि त्यांनी नवीन पिढीला गाणे शिकवले. काही तज्ञांच्या मते, ही पद्धत दीर्घकाळ टिकणारी आहे आणि अनेक पिढ्यांपर्यंत चालू राहू शकते. आता हा कार्यक्रम सुरूच आहे. वैज्ञानिक या पक्ष्यांवर लक्ष ठेवणार आहेत — ते जंगलात कसे टिकतात आणि त्यांचे गाणे इतर पक्ष्यांपर्यंत पोहोचते का, याचे अवलोकन करण्यात येणार आहे. या संशोधनातून हे स्पष्ट झाले की, संकटात असलेल्या प्रजातींचे संरक्षण करताना त्यांच्या “संस्कृती”लाही जपणे आवश्यक आहे.