अफजलखान वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराज काय म्हणाले…

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाच्या वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराजांनी काय आदेश काढला, याबाबतचे अस्सल पत्र प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. अफजलखानाच्या वधानंतर पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती येथील हिंदू मुसलमान यांचा असलेला इनाम पूर्वापार चालू ठेवा, असे या पत्रात म्हटले आहे. १६६० सालातील हे पत्र आहे. (Shardiya Navratri 2024)

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दसरा महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे आणि निवाडे यांचे प्रदर्शन जुना राजवाडा परिसरातील राजाराम हायस्कूलच्या सभागृहात खुले करण्यात आले. शिवाजी महाराजांची दहा पत्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींचा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी शासकीय ग्रंथ भांडारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रंथाचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पुराभिलेखागार कार्यालयाच्या सहायक संचालक दीपाली पाटील, पुराभिलेखाधिकारी गणेश खोडके आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल दहा पत्रे मांडण्यात आली आहेत. १६६० मध्ये शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी निळोपंत मुजुमदार यांना पुणे, इंदापूर, चाकण या प्रांतातील वतनाचा कारभार पाहण्याबाबतचे पत्र दिले. त्यानंतर महाराजांनी आणखी एक निवाडा पत्र दिले. तेही १६६० मधील आहे. अफजलखान वधानंतर पुणे, इंदापूर, चाकण, सुपे व बारामती येथील हिंदू मुसलमान यांचे असलेले इनाम पूर्वापार चालू ठेवण्याचे पत्र आहे. त्याचबरोबर बाबाजी सावंत यांस १६७१ साली लिहिलेले पत्र आहे. १६७२ मध्ये स्वराज्यातील प्रमुख गडकोटाच्या बांधणी व दुरुस्तीकरिता एक लाख ७५ हजारची तरतूद करण्याचा आदेश दिल्याचे अस्सल कागदपत्रही आहे. मोगल आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राखीव ठेवण्यात आलेल्या एक लाख २५ हजार होन इतक्या रकमेची तरतूद केल्याबाबतचे पत्र, १६६३ मध्ये किल्ले सिंहगडावर फितवा झाला याबद्दल कोकणात न जाता लष्करासह राजश्री मोरो त्रिमळ पेशवे व राजश्री निळो सोनदेऊ मुजुमदार यांना किल्ले सिंहगडावर जाण्याबाबतचे पत्र यांसह दक्षिण दिग्विजयानंतर दक्षिणेतील प्रांत आणि किल्ल्यांचा कारभार पाहण्यासासंबंधीची चार पत्रेही प्रदर्शनात मांडली आहेत. (Shardiya Navratri 2024)

याशिवाय राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले आदेश आणि पत्रेही प्रदर्शनात मांडली आहेत. या कागदपत्रांची संख्या २५० इतकी आहे. राजर्षी शाहू काळातील अनेक घटनांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी