मृत्यूची वाट

Editorial

-मुकेश माचकर

एका उतारवयातल्या राजाला मृत्युची फार भीती वाटत होती. काहीही करून मृत्यू टळायला हवा, असा एक ध्यास त्याने घेतला होता. त्यासाठी त्याने एक चिरेबंदी महाल उभारला. त्या अनेकमजली महालामध्ये सगळ्या सुखसोयी होत्या आणि एकच प्रवेशद्वार होतं.त्या द्वाराबाहेर सात हत्यारबंद तुकड्या तैनात होत्या. एक महालावर लक्ष ठेवण्यासाठी. दुसरी पहिल्या तुकडीवर लक्ष ठेवण्यासाठी. तिसरी दुसरीवर लक्ष ठेवण्यासाठी. असा कडेकोट बंदोबस्त.

महालाचं काम पूर्ण झाल्यानंतर राजा त्याचं निरीक्षण करण्यात मग्न असताना त्याला खो खो हसण्याचा आवाज आला.

महालाशेजारून जाणारा एक फकीर हसत होता.राजाने विचारलं, का हसतोस?

फकीर म्हणाला, हा काय मूर्खपणा उभा करून ठेवलाय?

राजा म्हणाला, हा जगातला सगळ्यात सुरक्षित महाल आहे. मृत्यूला प्रतिबंध करण्यासाठी बांधलाय मी. मूर्खपणा काय दिसला तुला त्यात?

फकीर म्हणाला, महाल बांधलास आणि त्याला दरवाजा ठेवलास. त्यातून मृत्यू येऊ शकणार नाही, असं वाटतं का तुला?

राजा म्हणाला, हा दरवाजा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आहे, त्यावर कडक पहारे आहेत.

फकीर म्हणाला, मृत्यू काही दरवाजाचं प्रयोजन विचारून येणार नाही आणि तुझा कितीही कडक पहारा त्याला थांबवू शकणार नाही.

राजा म्हणाला, पण, हाही दरवाजा बंद केला, तर काही काळाने मी आत अन्नपाण्याअभावी मृत्युमुखी पडेन.

फकीर म्हणाला, म्हणजे ठरल्या वेळेला तो येणार की तू जाणार, एवढाच प्रश्न आहे ना! मग हा सगळा मूर्खपणाचाच डोलारा नाही का?

Related posts

Dhanakad Criticized SC

Dhanakad Criticized SC: राष्ट्रपतींना निर्देश देण्याचा अधिकार न्यायपालिकेला नाही

Abhishek Sharma

Abhishek Sharma : ‘ऑरेंज आर्मी, हे तुमच्यासाठी!’

Tulsi revealed evm flaws

Tulsi revealed evm flaws: ईव्हीएम हॅक करता येते