बंडोबांना थंडोबा करण्याचा प्रयत्न; चार तारखेला अखेरचे चित्र स्पष्ट होणार

मुंबई; प्रतिनिधी : चार पक्ष आणि त्यांच्या दोन आघाड्या असे यापूर्वी मतदारसंघ वाटपाचे असलेले गणित यंदा सहा पक्ष आणि दोन आघाड्या असे झाले आहे. दोन्ही युती, आघाडी यांच्या जागा आता तीन-तीन पक्षांत वाटाव्या लागल्या आहेत. यामुळे इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे. एकट्या महायुतीतच एक-दोन नाही तर जवळपास ३६ जणांनी बंडखोरी केलेली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत ही बाब वेगळीच आहे; परंतु नाराजांनीदेखील मोठ्या प्रमाणावर बंड केल्याने हे बंड शमविण्याचे काम आता वरिष्ठांना करावे लागत आहे. राज्यात झालेल्या बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला सुमारे पन्नास जागांवर फटका बसणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जेमतेम १७-१८ दिवस राहिले आहेत. त्यात दिवाळीचा सण आहे. यामुळे प्रचारात अडथळे येत आहेत. अशातच येत्या तीन दिवसांत बंडोबांचे बंड थंड करावे लागणार आहे. जर या बंडोबांचे बंड कायम राहिले, तर राज्यातील ५० जागांवरील निकाल फिरण्याची शक्यता आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. एकट्या महायुतीतच ३६ बंडखोर उभे ठाकले आहेत. भाजपने साम- दाम- दंड- भेद वापरून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या काही नेत्यांना थंड केले आहे; परंतु सर्वाधिक बंडखोर हे भाजपचेच असल्याने आता शिंदे आणि अजित पवार गटही आक्रमक होत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोरांनी १६ जागांवर आव्हान उभे केले आहे. अजित पवारांच्या पक्षाचा एकच बंडखोर आहे.

याच्या उलट परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडीत १४ जागांवरच बंडखोर उभे राहिले आहेत. यात काँग्रेस आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाविरोधात काँग्रेसच्या दहा जणांनी बंडखोरी केलेली आहे. चार जागांवर उद्धव ठाकरेंच्या बंडखोरांनी काँग्रेसविरोधात उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. एरंडोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत; पण या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हर्षल माने यांनी बंडखोरी केली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत; पण त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील राजाभाऊ फड यांनी बंडखोरी केली आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच बंडखोरी झाली आहे. शरद पवार यांनी बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी दिली. काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या ज्योती मेटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर हे भायखळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून बंडखोरी झाली असून, मधु चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत; पण त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अविनाश लाड आणि शिवसेनेचेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उदय बने यांनी बंडखोरी केली आहे.

जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय भांबळे यांच्याविरोधात काँग्रेसचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी केली आहे. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनुराधा नागवडे  या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल जगताप यांनी बंडखोरी केली आहे. पुण्यात भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तीनही मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड केले आहे. सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाने दावा करत उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे, तर शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यात तयार नाही. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेचे (ठाकरे) अमर पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत; पण या मतदारसंघात गोंधळ झाल्याचे दिसले. काँग्रेसनेही दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली होती; पण एबी फॉर्म दिला नाही. माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

 जागा एक, इच्छुक अनेक

मतदारसंघ एक आणि इच्छुक अनेक असे चित्र बहुतांश मतदारसंघांत असून, अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांनी माघार घेतली नाही, तर या मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे गणित बिघडू शकते आणि विरोधी उमेदवारांसाठी लढत सोपी होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Related posts

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला