वटवाघळांची दुनिया

सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ वटवाघळांची जीवनशैली… (Bat)

वटवाघूळ सस्तन प्राणी

वटवाघूळ हवेत उडत प्रवास करतात. त्यामुळे तो पक्षी असल्याचा अनेकांचा समज आहे. पण तो सस्तन प्राणी आहे. तो पिलांना जन्म देतो. मादी एकावेळी एकाच पिलाला जन्म देते. एक महिन्यात त्याला दूध पाजवून त्याचे पालन पोषण करते. एक महिन्यात पिलू हवेत उडायला शिकते. फळे आणि कीटक खाऊन स्वावलंबी होते. वटवाघूळ निशाचर आहे. रात्री खाद्याच्या शोधात ते बाहेर पडतात आणि पहाटे आपल्या वसाहतीत परततात.

१४०० हून अधिक जाती

जगभरात वटवाघळांच्या १४०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतात वटवाघळाच्या १२३ जाती आहेत. सर्वांत मोठ्या वटवाघळाला फ्लॉइंग फॉक्सेस म्हणतात. भारतात फ्लाइंग फॉक्सेस मोठ्या संख्येने आढळून येतात. मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या ठिकाणाला वटवाघळांची वसाहत म्हणतात. कोल्हापूर शहरातील टाउन हॉल बाग येथे फ्लाइंग फॉक्सेसची वसाहत आहे. येथे दोन हजारावर वटवाघळे आहेत. पूर्वी पद्मा टॉकीजसमोरील शिवाजी तंत्रनिकेतन परिसरातही वटवाघळांची वसाहत होती. पण तेथील उंच झाडे तोडल्यामुळे ती दुसरीकडे स्थलांतरीत झाली. मार्केट यार्ड परिसरातील फळ बाजार मोठा असल्याने तिथेही वीस ते पंचवीस वटवाघळांची छोटी कॉलनी असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक सुनील करकरे यांनी सांगितले. पडकी घरे आणि गुहा आणि उंच झाडावर त्यांचे वास्तव्य असते. ती झाडाला उलटी लटकलेल्या अवस्थेत असतात. त्यांचे दात तीक्ष्ण धारदार असतात. (Bat)

वटवाघळांचे खाद्य

शाकाहारी आणि मांसाहारी अशा प्रामुख्याने दोन जाती आहेत. तर काही मिश्रआहारी आहेत. पेरु, सीताफळ, आंबा, चिकू आणि पपई ही शाकाहारी वटवाघळांची आवडती फळे आहेत. वटवाघळांच्या वस्तीपासून १५ ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या फळझाडांना ते लक्ष्य करतात. फळांचा गर खाऊन चोथा टाकून देतात. त्यांची पचनक्रियाही जलद असते. खाऊन झाल्यानंतर अर्धा तास ते तासाभरात मल:विसर्जन करतात. त्यामुळे उडताना त्यांचे वजन खूप कमी असते.

मांसाहारी वटवाघळांचा जोर कीटकांवर जास्त असतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठी मदत होते. वटवाघळांच्या विष्ठेतील बियांपासून तयार झालेली रोपे चांगली वाढतात. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. अनेक इमारतींवर जी वडाची झाडे उगवतात ती वटवाघळांच्या विष्ठेतील बियांतूनच उगवतात. कीटक खात असल्याने पिकांची नासाडी रोखण्यास मदत होते. पाकोळी ही वटवाघळाची छोटी जात आहे. पाकोळीही मोठ्या प्रमाणावर कीटक खाते. डास हे अत्यंत आवडते खाद्य आहे. डास आणि कीटक खात असल्याने काही प्रमाणात साथीचे आजार रोखायला मदत होते. जुन्या वाड्यात, भिंतीच्या पोकळीत पाकोळींचे वास्तव्य असते.

वटवाघळे शिकार कशी करतात?

वटवाघळे शिकार करताना विशिष्ट पद्धत वापरतात. ते आपल्या नाकपुड्यातून हळूवारपणे अतिशय उच्च वारंवारतेचे ध्वनी निर्माण करतात. ते उडत्या कीटकांवर आपटून मागे येतात. या प्रतिध्वनीवरून अचूक अंदाज घेत ते भक्ष्याचा वेध घेतात.

रोग वाहक

वटवाघळे खाद्याचा शोध घेताना ते रोगवाहक बनतात. पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावाचा प्रसार त्यांच्यामुळे होते. ती ज्या परिसरात जास्त प्रमाणात विष्ठा टाकतात त्या ठिकाणी दम्याच्या आजारात वाढ होत असल्याचा अभ्यास आहे. वटवाघळांमुळे कोविड साथ पसरली असल्याचे निरीक्षणही नोंदवले गेले आहे. कोविड काळात वटवाघळे ज्या परिसरात आहेत त्या ठिकाणी फिरु नका, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली होती.

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न

द्राक्षे पक्व होत असताना वटवाघळे मोठ्या संख्येने बागेकडे आकर्षित होतात. त्यांच्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी बागेत प्रखर दिवे लावतात. फटाके फोडून वटवाघळांना पळवून लावण्याचे प्रकार केले जातात. वटवाघळांना पिकलेली गोड द्राक्षे आवडतात. त्यामुळे बागेवर मासे मारण्याची जाळी अंथरली जाते. त्यामुळे वटवाघळे बागेजवळ येत नाहीत. (Bat)

वटवाघूळ हे पर्यावरणप्रेमी आहे. ते कीटकभक्षी आहेत. त्यांचा शेती आणि मानवाला चांगला फायदा होतो. ते कीटक खात असल्याने कीड नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच साथीचे आजार पसरणारे कीटकही खात असल्याने त्या आजारावर नियंत्रण येते. शाकाहारी वटवाघळांच्य विष्ठेतून पडणाऱ्या बीया चांगल्या रुजतात. त्यामुळे पर्यावरण राखण्यास मदत होते.

सुनील करकरे, प्रक्षी आणि प्राणी अभ्यासक

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

हत्तींच्या संवेदनशीलतेचे, परोपकाराचे दर्शन…

उद्धव-राज ठाकरे एकत्र