आजरा : तालुक्यातील हरपवडे गावात उच्छाद मांडलेल्या वानराला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. या वानराने पुरुष व महिला ग्रामस्थ वर्गाला त्रस्त केले होते, शिवाय झाडे, पिके आणि घरांचे नुकसान देखील केले होते. त्याला वन विभागाच्या सहाय्याने जेरबंद करण्यात आले. (Ajara)
मागील काही दिवस तालुक्यातील हरपवडे गावात वानरांचा एक कळप उच्छाद मांडत होता. परिसरातील पिके, झाडे, त्यावरील मोहर आणि घरांच्या कौलांची नासधूस त्यांनी केली होती. यापैकी एक वानर तर फारच त्रासदायक ठरले होते. गावाच्या गल्ली मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना तसेच शाळकरी मुलांवर वानर हल्ला करत होते. यामुळे परिसरात त्या वानराची दहशत पसरली होती.
याबाबत गावचे सरपंच सागर पाटील, देवदास गुरव व ग्रामस्थांनी वनविभागाकडे वानरांचा प्रतिबंध करण्याबाबत विनंती केली होती. वनविभागाने सापळा लावून वानराला पकडले. वनविभागाच्या सहकार्यामुळे हरपवडे गावातील ते त्रासदायक वानर अखेर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडत वनविभागाला धन्यवाद दिले. (Ajara)
सापळ्यात जेरबंद केलेल्या वानराला आंबोली जंगलामध्ये सोडण्यात आले. वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शकील मुजावर, वनरक्षक अस्मिता घोरपडे, वनमजूर मारुती शिंदे, अक्षय पाटील, शाहरुख शेख, विनायक पताडे, साहिल डेळेकर आदींनी मोहीम राबवली.
हेही वाचा :