मनसेला भाजपची जवळीक नडली

मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या कारणांची माहिती घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबरची जवळीक घातक ठरल्याचे मत पराभूत उमेदवारांनी नोंदवले.

आज राज यांनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीमध्ये ‘ईव्हीएम’संदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज यांच्याकडे केल्या. भाजपबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरली नाही, असे पराभूत उमेदवारांनी राज यांना सांगितले आहे. राज यांनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण ४२ उमेदवार उभे केले होते; मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज यांचे पुत्र अमित ठाकरे हेसुद्धा दादर-माहीम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

या पार्श्वभूमीवर राज यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई आणि परिसरातील पराभूत उमेदवारांना बोलावले होते. नेमका पराभव कशामुळे झाला याची चाचपणी त्यांनी या बैठकीमध्ये केली. मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता. सभांना गर्दी होत होती, मग त्याचे रूपांतर मतांमध्ये का झाले नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील, अशी अपेक्षा मनसेला होती; मात्र १३८ उमेदवार उभे करून एकही उमेदवार निवडून आला नाही. या वेळी बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीला भाजपशी जवळीक करत बिनशर्त पाठिंबा दिला होता; मात्र विधानसभेला भाजपशी जवळीक करणे फायद्याचे ठरले नाही, असे पराभूत उमेदवारांनी सांगितले. या सगळ्या गोष्टींची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये राज यांनी कोणतेही मार्गदर्शन केले नाही. त्यांनी केवळ पराभूत उमेदवारांना काय वाटते, हे जाणून घेतसे. आता राज यानंतर काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का, हे अजून गुलदस्त्यातच आहे.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ