मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यापाठोपाठ ’एक्झिट पोल’ समोर आले आहेत. त्यांतील निष्कर्षानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार चुरस होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या मतचाचणीत वेगवेगळे निष्कर्ष काढले असले, तरी त्यातून एक समान मुद्दा म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीत जागांचा फारसा फरक राहणार नाही. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे सर्वच संस्थांचे निष्कर्ष असले, तरी भाजपसह सर्वंच पक्षांच्या जागा मागच्या वेळच्या तुलनेत घटणार आहेत. अर्थात मागच्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अविभाजित होते.
‘इलेक्टोरल एज’ यांच्या महाराष्ट्राच्या’एक्झिट पोल’नुसार महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा अंदाजही यामधून वर्तवण्यात आला आहे. भाजपने सर्वाधिक १४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ‘एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळू शकतात. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या २७ जागा कमी होत असल्याचे दिसते. अंदाजानुसार, राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. महाविकास आघाडीला राज्यात १५० जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवला. आघाडीत काँग्रेसला ६० जागा मिळतील, असा अंदाज आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४६ आणि शिवसेना ठाकरे गटाला ४४ जागांवर यश मिळेल, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
‘इलेक्टोरल एज’च्या ’एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळतील, तर शिवसेना शिंदे गटाला फक्त २६ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना राज्यात २० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला २४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस १७ टक्के मते घेऊ शकते. शिवसेनेला १० आणि ठाकरे गटाला १५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त ६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
‘पोल डायरी’ने जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये महाविकास आघाडीला धक्का बसत आहे. या पोलमध्ये महायुतीला १२२ ते १८६ जागा आहे, तर महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘पोल डायरी’च्या या ‘एक्झिट पोल’मुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. चाणक्य आणि अन्य काही संस्थांनी महायुतीला कौल दिला असला, तरी लोकशाही आणि ‘झी’च्या मतदानोत्तर चाचणीत महाविकास आघाडीला कौल दिला आहे.