राष्ट्रवादी पक्षाला सर्वोच्च निर्देश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला वेगळी ओळख म्हणून उतरावे लागेल, असे न्यायालयाने सांगितले.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, की शरद पवार यांच्याशी तुमचे वैचारिक मतभेद आहेत. विधानसभा निवडणुकीत तुम्ही त्यांच्या विरोधात आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निवडणुकीचा प्रचार करताना तुम्ही शरद पवार यांचा जुना अथवा नवा व्हिडिओ किंवा फोटो वापरू नका. याच्या अंमलबजावणनीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना परिपत्रक जारी करा. वेगळा राजकीय पक्ष म्हणून स्वतःची ओळख बनवा.

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याआधीच्या सुनावणीत, न्यायालयाने अजित पवार गटाला चिन्हाविषयी निर्देश दिले होते. यावेळी न्यायालयाने स्पष्ट सांगितले होते, की महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ठळक जाहिराती द्या. यामध्ये घड्याळ चिन्हासह हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, याचा उल्लेख करावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा.

शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न, अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद

शरद पवार यांची बाजू मांडताना वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी  पोस्टरवरील काही फोटो आणि सोशल मीडिया पोस्ट न्यायालयाच्या निर्दशनास आणून देत, ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे उमेदवार अमोल मिटकरी यांनी केवळ शरद पवार दिसत असलेला फोटो प्रसिद्ध केल्याचे दाखवून दिले आणि अजित पवारांकडून शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा त्यांनी सांगितले.

अजित पवार यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील बलबीर सिंग यांनी आरोप फेटाळून लावले. त्यांनी दावा केला की जे काही दाखवण्यात आले आहे त्यात छेडछाड करण्यात आली. त्यावर सिंघवी यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले की, सदर व्हिडिओ अमोल मिटकरी यांच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले