खारीने सोडला शाकाहार

नवी दिल्ली : खार आपल्या अवतीभवती वावरणारी. गुबगुबीत आणि गोजिरवाण्या खारीच्या हालचाली चित्तवेधक असतात. मऊ आणि कठिण कवचाची फळे, शेंगा, शेंगदाणे, कोवळे कोंब आणि कळ्या हे त्यांचे खाद्य. म्हणजे ती शाकाहारीच. ती शिकार करत नाही… असा आपला आतापर्यंतचा समज. मात्र या समजाला छेद देणारे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तर ही खारुताई चक्क मांसाहारही करते, असे यात सिद्ध झाले आहे. (Squirrel )

झाडांच्या फांद्यावर इकडे तिकडे सतत उद्योगात असलेली ही खार गरज पडली तर भक्ष्यही पकडते. विशेषत: छोटे उंदीर पकडून ती त्यावर मारत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शाकाहारी खारूताई आता मांसाहारही करू लागले आहे, असे म्हणावे लागेल.

स्प्रिंगर नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ‘व्होल हंटिंग : नोव्हेल प्रिडेटरी अँड कार्निव्होरस बिहेवियर बाय कॅलिफोर्निया ग्राउंड स्क्विरेल्स’ नावाच्या एका नवीन अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील या खारी ‘सर्वभक्षक’ असल्याचे त्यात पुराव्यानिशी मांडले आहे. (Squirrel)

विस्कॉन्सिन-इओ क्लेअर विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, डेव्हिस यांच्या अभ्यासात खारी मोठ्या प्रमाणावर मांसाहारी असल्याचे म्हटले आहे. तसा अनुभवजन्य पहिला पुरावाही नोंदवण्यात आला आहे.

ही निरीक्षणे २०२४ मध्ये नोंदवण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या ग्राउंड स्क्विरेल्स प्रकल्पाच्या दीर्घकालीन वर्तणूक पर्यावरणशास्त्राच्या कॉन्ट्रा कोस्टा काउंटीमधील ब्रिओनेस प्रादेशिक उद्यानात हा अभ्यास करण्यात आला. जून ते जुलैदरम्यान करण्यात आलेली निरीक्षणे आणि नोंदवण्यात आली. त्यामध्ये बहुतांशवेळा जमिनीवर राहणाऱ्या खारींचे वर्तन अभ्यासण्यात आले. निरीक्षणे केलेल्यांपैकी ४२ टक्के खारी लहान उंदरांची शिकार करतात, असे धक्कादायक निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. (Squirrel)

आमच्यासाठी ही बाब खूपच धक्कादायक होती, अशी टिपणी या प्रकल्प अभ्यासाच्या मुख्य लेखिका जेनिफर ई. स्मिथ यांनी केली. स्मिथ या जीवशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत. तसेच युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या ‘सोनजा वाइल्ड’मधील खारीच्या वर्तनातील बदलाच्या अभ्यास प्रकल्पाचे अनेक वर्षे नेतृत्व करतात.

‘खारींचे असे वर्तन आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. खार बऱ्यापैकी माणसाळलेला सर्वपरिचित प्राणी आहेत. ती कधी अंगणात दिसते. कधी खिडकी बाहेर दिसते; आपण तिच्याशी संवादही साधायला प्रयत्न करतो. मात्र तरीही आतापर्यंत विज्ञानात कधीही न नोंदवलेली ही वर्तणूक पाहून धक्का बसला. त्यावरून एक लक्षात येते की, आपल्या सभोवतालच्या जगाच्या नैसर्गिक इतिहासाबद्दल अजून बरेच शिकण्यासारखे आहे,’ असे त्या म्हणाल्या.

विशेष म्हणजे केवळ नवसंशोधक आणि अभ्यासकांनीच नव्हे तर वन्यजीव तज्ज्ञांनाही खारीच्या या वर्तनबदलाची कल्पना नव्हती.

स्मिथ यांना खारीबद्दल केलेल्या निरीक्षणाबाबत संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यावर विद्यार्थ्यांनी व्हिडिओग्राफी केलेले पुरावे दिले. (Squirrel)

‘आम्ही दररोज खारींचे निरीक्षण करू लागलो.  माझा स्वत:वर विश्वासच बसत नव्हता. तेव्हापासून, आम्ही जवळजवळ दररोज खार उंदरांच्या पिलाची शिकार करत असल्याचे पाहिले. आम्हाला त्या परिसरात असेच चित्र सर्वत्र दिसले,’ असे लेखात संशोधकाने नमूद केले आहे.

संशोधकांच्या मते, मानवी हस्तक्षेपामुळे वेगाने बदलत असलेल्या वातावरणात टिकून राहण्यासाठी खारींनी हा बदल आत्मसात केला असावा. अन्न उपलब्ध नसेल त्यावेळी सर्वभक्षी म्हणून जुळवून घेण्याची क्षमता तिने विकसीत केली असावी.

(लेख आणि छायाचित्र ‘डाऊन टू अर्थ’च्या सौजन्याने)

Related posts

हत्तींच्या संवेदनशीलतेचे, परोपकाराचे दर्शन…

पोटातले ओठावर!

Dr. B R Ambedkar : आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले? : वास्तव आणि विपर्यास