कोल्हापूर; प्रतिनिधी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प शिरोळ तालुक्यातील हरोली येथे कार्यान्वित झाला. प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे झाले. यामुळे हरोली आणि जांभळी या गावांतील ७९० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे. (Solar Power Project)
कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी वाशिम जिल्ह्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे झाले. यामध्ये हरोली (जि. कोल्हापूर) येथील प्रकल्पाचाही समावेश आहे.
या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट) सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट इतकी आहे. यामधील अनेक प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे.
आमच्या गावात उभारलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. यामुळे रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाण्याचा त्रास वाचणार आहे. या प्रकल्पात आमच्या गावास प्राधान्य दिल्याबद्दल शासनाचे आभार.
– तानाजी माने, सरपंच, हरोली
वीज ग्राहक आणि शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प फायद्याचे आहेत. यामुळे शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रमपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकासकामात आपला सहभाग नोंदवावा.
, मुख्य अभियंता, महावितरण
हेही वाचा :