सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था :  भारताच्या लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू या बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिला दुहेरीत तनिशा क्रॅस्टो-अश्विनी पोनप्पा, तेरेसा जॉली-गायत्री गोपिचंद या भारतीय जोड्यांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली.

लक्ष्यने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनचा फॉर्म उपांत्यपूर्व सामन्यातही कायम ठेवला. भारताच्या मेरेबा लुवांग मैस्नम याच्याविरुद्धचा हा सामना लक्ष्यने ४१ मिनिटांमध्ये २१-८, २१-१९ असा जिंकला. उपांत्य फेरीत लक्ष्यची लढत जपानच्या शोगो ओगावाशी होईल. भारताच्या द्वितीय मानांकित प्रियांशू राजावतनेही उपांत्यपूर्व फेरीत विजय नोंदवताना व्हिएतनामच्या ग्युएन हाई दांगवर अवघ्या ३२ मिनिटांमध्ये २१-१३, २१-८ अशी मात केली. उपांत्य फेरीत तो सिंगापूरच्या चतुर्थ मानांकित जिया हेंग जेसन तेह याच्याविरुद्ध खेळेल. पुरुष दुहेरीमध्ये पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय-साई प्रतीक के. या भारतीय जोडीने मलेशियाच्या लिम झे जिआन-वोंग तिएन सी या जोडीला एका सेटची पिछाडी भरून काढत १२-२१, २१-११, २१-६ असे हरवले. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर इशान भटनागर-शंकर प्रसाद उदयकुमार या भारतीय जोडीचे आव्हान आहे. इशान-शंकर जोडीने मलेशियाच्या कांग खाई शिंग-एरॉन ताई या तृतीय मानांकित जोडीचा २१-१२, ३०-२९ असा धक्कादायक पराभव केला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूने चीनच्या दाई वांगला ४८ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१५, २१-१७ असे पराभूत केले. उपांत्य फेरीमध्ये सिंधूचा सामना भारताच्याच उन्नती हुडाशी होणार असून उन्नतीने अमेरिकेच्या इशिका जैस्वालला अवघ्या २९ मिनिटांमध्ये २१-१६, २१-९ असे हरवून उपांत्य फेरी गाठली. महिला दुहेरीमध्ये तनिशा क्रॅस्टो-अश्विनी पोनप्पा या अग्रमानांकित भारतीय जोडीने भारताच्याच प्रिया कोंजेंगबम व श्रुती मिश्रा या पाचव्या मानांकित जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत २१-१२, १७-२१, २१-१६ असा पराभव केला. उपांत्य फेरीत तनिशा-अश्विनी जोडीसमोर चीनच्या बाओ ली जिंग व ली क्विआन यांचे आव्हान आहे. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये भारताच्या द्वितीय मानांकित तेरेसा जॉली-गायत्री गोपिचंद या जोडीने मलेशियाच्या सहाव्या मानांकित गो पेई की-तेओ मेई शिंग या जोडीला २१-८, २१-१५ असे हरवले. उपांत्य फेरीत त्या थायलंडच्या बेनयापा एमसार्ड-नन्ताकार्न एमसार्ड या तृतीय मानांकित जोडीशी झुंजतील.

मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो या पाचव्या मानांकित जोडीने उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी लू बिंग कून-हो लो ए या मलेशियन जोडीला २१-१६, २१-१३ असे हरवले.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत