श्री अंबाबाई नवरात्रासाठी १ लाख ८० हजार लाडू प्रसाद

कोल्हापूर : प्रतिनिधी

श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव काळातील बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट यंदाही कळंबा कारागृहातील बेकरी विभागाला देण्यात आले आहे. या विभागाकडून १ लाख ८० हजार लाडू बनवून घेतले जाणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाकडून चाचणी झाल्यानंतर हे लाडू मंदिरात आणले जातील, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, श्री अंबाबाई देवीच्या नित्यपूजेतील सोन्याच्या जडावी अलंकारांची स्वच्छता रविवारी पूर्ण झाली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंदिर आवारातील मंडपात देवीचे सर्व दागिने लख्ख करण्यात आले. स्वच्छता आणि इतर कामांसाठी मंदिर व्यवस्थापनांसह भाविकही सेवा देऊ लागले आहेत. सुमधूर भक्तिगीतांमुळे मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळातील प्रसन्नतेची छटा उमटू लागली आहे. विक्रेत्यांकडून विविध साहित्यांचे स्टॉल सजू लागले आहेत.

दर्शन रांग शेतकरी संघाच्या कार्यालयातूनच सुरू होणार आहे. तेथून भाविक बाहेरील दर्शन मंडपात दाखल होतील, असे नियोजन आहे. मंडपावर पत्रे घातले असून पिण्याच्या पाण्याचीही सोयही केली आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्थाही देवस्थान समितीकडून सक्रीय ठेवण्यात येणार आहे. घाटी दरवाजा, नवगृहाजवळ असलेले आरोग्य तपासणी केंद्र सुसज्ज ठेवले जाणार आहे.

जुन्या गरूड मंडपाच्या जागी मंडपाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पालखी सोहळा व देवीचे धार्मिक विधी येथे होणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहेत.

११६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

अंबाबाई मंदिर व परिसरावर ९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच आहे. त्यांचा आढावा घेऊन आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समिती प्रशासक अमोल येडगे यांनी मंदिर व भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आणखी वीस कॅमेरे बसवले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यानेही मंदिर परिसरावर वॉच ठेवण्यात येणार आहे.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ