कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गुरुवारी (दि. ३) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात देशभरातील भाविक येतात. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (दि.३) देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होणार असल्याने दर्शन रांगांचे नियोजन केले आहे. (Shardiya Navratri 2024)
गुरुवारी (दि.३) सकाळी आठ वाजता अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात तोफेची सलामी झाल्यानंतर मंदिरात घट बसवून घटस्थापनेची ललकारी देण्यात येणार आहे. त्यानंतर घंटानाद होईल. विविध धार्मिक विधी होऊन दुपारी दोनच्या सुमारास अलंकार पूजा बांधली जाणार आहे. उत्सवकाळात रोज रात्री नऊ वाजता पालखी सोहळा होणार आहे. देवीची विविध रुपात पूजा बांधली जाणार आहे.
मंदिर आणि परिसर विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पूर्व दरवाजासमोर मंडप उभारला आहे. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत पंखे आणि कुलरची सोय केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चार ठिकाणी २० हजार लिटर वॉटर प्यूरीफायरची सोय केली आहे. (Shardiya Navratri 2024)
जिल्हा प्रशासनाने शेतकरी संघांचा हॉल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारपासून या ठिकाणी दर्शन रांगेस सुरुवात होणार आहे. देवीचा वार शुक्रवार आणि शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. आवारात सीसीटीव्हीची संख्या वाढवण्यात आली असून अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवले आहेत. मंदिराच्या पूर्व, दक्षिण व उत्तर दरवाजावर बॅग स्कॅनर तर गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या पूर्व दरवाजाबाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. मंदिर आवारात गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
३ ऑक्टोबरचे दिवसभराचे सांस्कृतिक कायर्क्रम :
- दररोज सकाळी ६ त ७ ललितसहस्त्रनाम : संगीता रेवणकर
- दररोज सकाळी ७ ते ८ श्रीसुक्त पठण : जगदीश गुळवणी
- निरुपमा भजनी मंडळ, कोल्हापूर, स्वाती देशपांडे : ८ ते ९.१५
- हरिप्रिया भजनी मंडळ, कोल्हापूर, भारती माने : ९.१५ ते १०.३०
- श्री निधी भजन मंडळ, कोल्हापूर, मंगल गलगली : १०.३० ते ११.४५
- ओम भजनी मंडळ, शास्त्रीनगर, कोल्हापूर, वनिता खरसिंगे : ११.४५ ते १
- श्री संत बाळूमामा भजनी मंडळ, गंगापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर, महेश पाटील : १ ते २.१५
- श्री पंत महिला भजनी मंडळ, कोल्हापूर ,सुजाता धुमाळ : २.१५ ते ३.३०
- पार्वती महिला भजनी मंडळ, इचलकरंजी, शिवमंदीर स्वामी : ३.३० ते ४.४५
- बासरी वादन-संकेत जोशी, अमरावती : ४.४५ ते ६
- गायन सेवा-अनुजा गाडे, येरवडा, पुणे : ६.ते ७.३०
- गायन सेवा-विदुषी शाम्मवी अभिषेक, बेंगलोर : ७.३० ते ८.३०
हेही वाचा :