मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती गेल्या सव्वा दोन वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही विकास कामे हाच आमचा चेहरा आहे. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आमच्या जागा वाटपाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून काही मोजक्या जागांबाबत निर्णय व्हावयाचा आहे. तो येत्या काही दिवसात झाल्यानंतर जागा वाटपाचे फॉर्मुला जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डचे प्रकाशन बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis)
तिकीट न मिळणारे पक्ष सोडत आहेत : अजित पवार
राष्ट्रवादीतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. ज्यांना मी तिकीट देणार नाही, ते पक्ष सोडत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, महायुतीने घेतलेल्या निर्णयामुळे जनता आमच्यावर खुश आहे, त्यामुळे विरोधक बिथरले आहेत. सर्व प्रमुख नेते आपल्यासोबत आहेत. ज्यांना निवडणूकीत तिकीट मिळणार नाही, ते बाहेर पडत आहेत. त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही., असेही त्यांनी सांगितले.
‘ती’ निव्वळ टेबल न्यूज
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचे जास्त आमदार असतानाही तुम्हाला मुख्यमंत्री केले, त्यांनी आता जागा वाटपावेळी उदारपणा दाखवावा, असा दबाव दिल्लीतील बैठकीत टाकला असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याबाबतच्या वृत्ताचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खंडन केले. असे काहीही घडलेले नाही.ही केवळ टेबल न्यूज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :