सातारा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा ‘ताप’

सातारा : प्रशांत जाधव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच दुर्गम भागात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कसलाच वचक राहिला नसल्याचे वास्तव आहे. राज्यातील तसेच परराज्यातील अनेकजण वैद्यकीय शिक्षण नसतानाही डॉक्टर म्हणून बिनदिक्कतपणे जिल्ह्यात कुठे दवाखाने उघडून तर कुठे घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. चुकीच्या उपचारांमुळे एखाद्याचे आयुष्य अंध:कारमय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, केवळ तक्रार येईल त्याठिकाणीच आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात असल्याचे बोलले जाते. (Satara bogus doctor)

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांच्या गावात नजर टाकली तर मूळव्याधीवर उपचार करण्याच्या नावाखाली दवाखान्याच्या पाट्या लावून अनेकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामध्ये बहुतांशी लोक हे परप्रांतीय आहेत. त्यांच्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष आहे. माण-खटाव, पाटण, जावली, महाबळेश्‍वर या तालुक्यात घरोघरी जाऊन लोकांवर उपचार करणारे डॉक्टर अनेकदा आढळतात. यातील अनेकांशी बोलणे केले तर त्यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचे आकलन झाल्याशिवाय राहत नाही. अशा अनेकांनी उपचार केल्यामुळे जिल्ह्यातील काही लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न आयुष्यभरासाठी निर्माण झाल्याची काही उदाहरणे यापूर्वी घडली आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यावर फक्त कारवाईचे नाटक करून पुन्हा ‘मागचे पाढे पंचावन्न’ असा प्रकार सुरू आहे. (Satara bogus doctor)

आरोग्य विभागासह पुनर्विलोकन समितीला जागे व्हावे लागणार

तत्कालीन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन शोध समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यात बोगस डॉक्टरांच्या या प्रकाराचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी जयवंशी यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवत निर्ढावलेल्या आरोग्य यंत्रणेने किती बोगस डॉक्टरांवर कारवाई केली हा शोधाचा भाग आहे. जिल्हाधिकाऱ्यांना, सामान्य जनतेला या विषयाचे गांभीर्य कळले असले तरी ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, त्यांनी ते मनावर घेण्याची गरज आहे. केवळ कागदोपत्री कारवाया करून पाठ थोपटून घेण्यापेक्षा जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्या ‘आजारा’वर कायमचा उपचार करण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीला जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे.

आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष

जिल्ह्यातील दवाखान्यांना परवानगी देणे हा विषय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा तसेच जिल्हा रूग्णालय यांच्या अखत्यारितील आहे. या परवानग्या देताना प्रशासनाकडून संबंधित दवाखाना व्यवस्थापनाला अनेक अटी आणि शर्ती घातल्या जातात. मात्र, कालांतराने ना दवाखाना व्यवस्थापन त्या अटी शर्थी पाळते ना आरोग्य विभाग ते पाळल्या जात असल्याची खात्री करते. त्यामुळे अनेक ठिकाणी रूग्णांना अडचणी तसेच समस्यांचा सामना करावा लागतो. (Satara bogus doctor)

कंपाउंडर झाला तीन वर्षांत डॉक्टर

दुर्गम भागातील तसेच दुष्काळी भागातील अनेकजण पोट भरण्यासाठी मुंबईला जातात, त्यातले काहीजण तिथे रूग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करतात. त्यानंतर हेच बहाद्दर गावाला येऊन अपुऱ्या ज्ञानाच्या बळावर गावकुसातील माणसांवर उपचार करून आपण डॉक्टर होण्यासाठी किती कष्ट घेतल्याचे सांगत, डॉक्टर असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात. तर काही जणांच्या डिग्रीच वादात असून राज्य शासनाने अशा लोकांच्या व्यवसाय करण्यावर बंधने आणली आहेत. तरीही ते गावागावांत फिरताना दिसत आहेत.

‘हाताला धरलंय रोगाला हेरलंय’

बोगस डॉक्टर प्रकरण जसे ग्रामीण, शहरी भागात गंभीर तसेच झाडपाल्याचे औषध देणाऱ्यांनीही गावागावांत बस्तान बसवले आहे. शिक्षणाचा आणि त्यांचा दुरान्वये संबंध नसताना केवळ आमचा पिढीजात व्यवसाय असल्याचे सांगून लोकांच्या आयुष्याशी खेळ करण्याचे काम केले जात आहे. हे लोक रूग्णाची कोणतीही तपासणी न करता केवळ हाताला धरून नाडी परीक्षण करतात आणि त्यांच्याकडील झाडपाल्याचे औषध देतात. याच भोंदू वैद्यांकडून सांधेदुखी अथवा हाडांच्या दुखण्यावर झाडपाल्यात मिळसून स्टीरॉईडसारखे औषध दिले जाते. त्यामुळे रूग्णाला वेदनेपासून तात्पुरती मुक्ती मिळत असली तरी त्याचे गंभीर परिणाम रूग्णाला भोगावे लागतात.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ