Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

Royal Challengers

Royal Challengers

जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएलच्या अठराव्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचा रविवारी ९ विकेटनी पराभव केला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांच्या दमदार अर्धशतकांमुळे बेंगळुरूने राजस्थानचे १७४ धावांचे आव्हान १७.३ षटकांत पार केले. या विजयानंतर बेंगळुरूचा संघ गुणतक्त्यात ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (Royal Challengers)

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बेंगळुरूच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत सुरुवातीपासूनच राजस्थानच्या धावसंख्येला लगाम लावला. राजस्थानकडून केवळ सलामीवीर यशस्वी जैस्वालला मोठी खेळी करता आली. यशस्वीने ४७ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांसह ७५ धावा केल्या. अखेरच्या षटकांत ध्रुव जुरेलच्या फटकेबाजीमुळे राजस्थानला १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. जुरेलने २३ चेंडूंमध्ये प्रत्येकी दोन चौकार, षटकारांसह नाबाद ३५ धावा केल्या. (Royal Challengers)

राजस्थानच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना सॉल्ट-विराट जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. विशेषत: सॉल्टने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवल्यामुळे बेंगळुरूला पॉवर-प्लेमध्ये ६५ धावा वसूल करता आल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. अखेर कार्तिकेयने सॉल्टला बाद करून ही जोडी फोडली. सॉल्टने ३३ चेंडूंमध्ये ५ चौकार व ६ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. सॉल्ट बाद झाल्यानंतर विराट व देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ८३ धावा जोडत बेंगळुरूचा विजय साकारला. विराटने ४५ चेंडूंमध्ये ४ चौकार, २ षटकारांसह नाबाद ६२, तर देवदत्तने २८ चेंडूंमध्ये ५ चौकार, एका षटकारासह नाबाद ४० धावा केल्या. (Royal Challengers)

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स – २० षटकांत ४ बाद १७३ (यशस्वी जैस्वाल ७५, रियान पराग ३०, ध्रुव जुरेल नाबाद ३५, जोश हेझलवूड १-२६, कृणाल पंड्या १-२९) पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – १७.३ षटकांत १ बाद १७५ (फिल सॉल्ट ६५, विराट कोहली नाबाद ६२, देवदत्त पडिक्कल नाबाद ४०, कुमार कार्तिकेय १-२५).

हेही वाचा :

‘ऑरेंज आर्मी, हे तुमच्यासाठी!’

भारताला तिरंदाजीत सुवर्ण

Related posts

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

Punishment

Punishment : विनयभंग करणाऱ्या शिक्षकास सक्तमजुरी

BCCI Tribute

BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली