PTM’s fourth Championship  : हंगामात ‘पाटाकडील’ला चौथ्यांदा विजेतेपद

PTM’s fourth Championship

कोल्हापूर : प्रतिनिधी : फुलेवाडी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट आयोजित ‘तोडकर संजीवनी चषक २०२५’ फुटबॉल स्पर्धेतील  अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने विजेतेपद पटकावले. हंगामातील पाटाकडीलचे चौथे विजेतेपद आहे.  पूर्णवेळेत गोलशून्य बरोबरी व टायब्रेकरमध्येही ३-३ गोल बरोबरीत राहिलेल्या सामन्यात सडनडेथवर पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने खंडोबा तालीम मंडळला १-० असे पराभूत केले. (PTM’s fourth Championship)

अंतिम सामना पाटाकडील (अ) आणि खंडोबा तालीम या तुल्यबळ संघात झाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. पावसातही प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद लुटला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून वेगवान खेळ केला. पण पूर्णवेळेत गोलची कोंडी फुटली नाही. पाटकडीलकडून प्रथमेश हेरेकर, निवृत्ती पवनोजी, ऋषिकेश मेथे-पाटील, ओंकार पाटील, अन्शीद अली यांनी तर खंडोबाकडून पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव अमीन खझीर, प्रथमेश गावडे यांनी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही. पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. (PTM’s fourth Championship)

         सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये  खंडोबाच्या रोहन आडनाईक, प्रभू पोवार, संकेत मेढे यांनी अचूक गोल केले. तर प्रथमेश गावडे व अमीन खझीर गोल करण्यात अपयशी ठरले. पाटाकडीलकडून रोहित पोवार, यश देवणे, अक्षय पायमल यांनी अचूक गोल केले पण त्यांच्या प्रतिक बदामे, निवृत्ती पवनोजी यांनी मारलेले फटके गोलरक्षक आकाश मेस्त्रीने रोखले. टायब्रेकरमध्ये सामना ३-३ असा बरोबरीत राहिल्याने सडनडेथचा अवलंब करण्यात आला. (PTM’s fourth Championship)

          सडनडेथमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. खंडोबाच्या रोहित जाधवने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला तटला. तर पाटाकडीलच्या नबी खानने मारलेल्या फटका गोलरक्षक आकाश मेस्त्रीने रोखला. त्यानंतर खंडोबाच्या ऋतुराज संकपाळ, पृथ्वीराज साळोखे यांनी अचूक गोल नोंदविले. पाटाकडीलच्या अरबाज पेंढारी व ओंकार पाटील यांनीही गोल नोंदवून बरोबरी साधली. खंडोबाच्या लायकरने मारलेला फटका गोलरक्षक राजीव मिरियालाने रोखला तर पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटीलने अचूक गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. अशाप्रकारे पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने ‘तोडकर संजीवनी चषक’ पटकाविला आणि यंदाच्या हंगामातील चौथ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (PTM’s fourth Championship)

        स्पर्धेचा बक्षीस समारंभ तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागत तोडकर, सौ. संजीवनी तोडकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे ऋतुराज क्षीरसागर आदींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी फुलेवाडी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विजेत्या पाटाकडील (अ) ला एक लाख रुपये व चषक तर उपविजेत्या खंडोबा संघास ५० हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहूमान ऋषिकेश मेथे-पाटीलने पटकावला. त्याच्यासह बेस्ट गोलकीपर – राजीव मिरयाला, बेस्ट डिफेन्स – अरबाज पेंढारी ( सर्वं पाटाकडील), बेस्ट हाफ – प्रभू पोवार, बेस्ट फॉरवर्ड – अमीन खझीर ( सर्वं खंडोबा) यांना कलर टिव्ही भेट देऊन गौरव करण्यात आला. फुलेवाडी क्रीडा मंडळला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले. जुना बुधवार पेठ संघाचा सचिन मोरे शिस्तबद्ध खेळाडू ठरला. सामनावरचा बहूमान खंडोबाचा गोलरक्षक आकाश मेस्त्री याला मिळाला. (PTM’s fourth Championship)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक