प्रकाश होगाडे यांचे निधन

इचलकरंजी : प्रतिनिधी :  महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.  मंगळवारी (दि.१९) सकाळी आठ वाजता इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.

समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष असलेल्या होगाडे यांची बहुतांशी राजकीय कारकीर्द ही जनता दलामध्ये घडली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले होते. पुढे त्यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. या पक्षाचे ते प्रदेश उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रधान महासचिव अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती. इचलकरंजी विधानसभा निवडणुकी त्यांनी या पक्षाकडून लढवली होती. अलीकडेच त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. या पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते.

इचलकरंजी इंजिनिअरिंग असोशिएशन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग धारक संघर्ष  समिती, इंडियन टेक्सटाईल फेडरेशन या संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषवली.  पारिजात गृहनिर्माण संस्था, आनंद सहकारी ग्राहक संस्था, उद्योजक सहकारी पतसंस्था, साधना सहकारी बँक, इचलकरंजी को ऑप सिमेंट कंपनी,  प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क,  कोल्हापूर जिल्हा सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, इचलकरंजी को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल लिमिटेड याचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

मनोरंजन मंडळ, आपटे वचन मंदिर, आदर्श शिक्षण, क्रांती शिक्षण संस्था यासह विविध संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले. गेली तीस वर्षे ते वीज क्षेत्रामध्ये सक्रिय होते. या क्षेत्राचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. एन्रॉन विरोधी लढा, विजेचे वाढते दर, त्यासाठी वीज नियामक आयोग, राज्य शासन, महावितरण यांच्याशी दिलेला लढा, उच्च न्यायालय – सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाखल केलेले दावे, विजेचे सामान्य नागरिक, उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा यामुळे त्यांची प्रतिमा राज्यभर उंचावली गेली. त्यातूनच त्यांच्याकडे वीजतज्ञ म्हणून पाहिले जात होते. या कामाची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.  अलीकडे इचलकरंजी शहराच्या दूधगंगा नळ पाणी योजनेच्या सुळकूड नळ पाणी कृती समितीचे ते समन्वयक म्हणून काम पाहत होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी