या माणसाचा प्रवास थक्क करणारा होता. दहा मुलातलं नववं मूल. पितृछत्र लहानपणीच हरपल्यानं कुटुंबाची वाताहत झालेली. तल्लख बुध्दी नि स्मरणशक्ती असूनही परिस्थितीमुळे सुरळीत शिक्षण शक्य नव्हतं. नोकरी करत बाबा जिद्दीने पोस्ट ग्रॅज्युएट झाले, विद्यापीठात अव्वल आले, फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तिथे नोकरीचा प्रस्ताव मिळूनही दिलेला शब्द पाळायला टिळक-आगरकरांच्या ध्येयवादी शिक्षणसंस्थेत परत आले. लहान वयात भूशास्त्र विभागप्रमुख झाले. डी. ई. सोसायटीचे सेक्रेटरी नि फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले. शिवाय वेळात वेळ काढून विज्ञानप्रसार चालूच होता. ( Prabhakar Sovani )
- डॉ. अनुराधा सोवनी
प्राध्यापक प्रभाकर विष्णू सोवनी.
माझे बाबा.
२०२५ हे त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. त्यांना जाऊनही आता दहा वर्षं झाली, पण रोज त्यांची आठवण येतेच. दुःखाने नव्हे, तर आनंदाने, कृतज्ञतेने. ‘सर्वत्र खुणा मजला, त्यांच्याच दिसताहेत’ असं घडतं. कारण माझ्या घरी ठायी ठायी त्यांचं अस्तित्व जाणवतं. माझी सर्व प्रगतिपुस्तकं, बक्षिसं, फोटो, लेख, पत्रं त्यांनीच निगुतीने जपलेली असतात. पुस्तकांना त्यांनी घातलेली सुबक वेष्टणं, त्यावर त्यांच्या मोत्यासारख्या अक्षरात पुस्तकाचं नि लेखकाचं नाव असतं. माझ्या घरी शोभेसाठी मांडून ठेवलेल्या शंख-शिंपल्यांच्या प्रकारांविषयी आमचं बोलणं झालेलं असतं नि त्यांनी प्रत्येक प्रकाराचं शास्त्रीय नाव मला सांगितलेलं असतं. ( Prabhakar Sovani )
ही त्यांची सहजप्रवृत्ती होती. मराठीतून ज्ञान-विज्ञान प्रसार हे त्यांनी हौसेने, स्वयंस्फूर्तीने नि तळमळीने अंगावर ओढवून घेतलेलं काम होतं, जे ते शेवटपर्यंत करत राहिले. पदराला खार लावून, भरपूर वेळ नि कष्ट करून त्यांनी ज्ञानविज्ञानाच्या भाकऱ्या भाजल्या.
भूशास्त्र (जिऑलॉजी) हा त्यांचा विषय, पण त्यांच्या चौफेर जिज्ञासेला, कुतूहलाला नि अभ्यासाला कोणताच विषय वर्ज नव्हता. सतत लेख लिहून, शाळा-कॉलेजेसमध्ये भाषणं देऊन त्यांनी माहिती घराघरांत पोहोचवली. ( Prabhakar Sovani )
कोयनानगरच्या भूकंपानंतर त्या विषयातला तज्ज्ञ म्हणून आकाशवाणीने त्यांना भाषणाला बोलावलं. त्यांचं सुस्पष्ट वाणीतलं मुद्देसूद, ओघवतं भाषण आणि सोप्या मराठीत किचकट तांत्रिक विषय समजावून सांगण्याची हातोटी बघून पुढे अनेक भाषणांसाठी आकाशवाणी त्यांना बोलावत राहिली.
व्याख्याने आणि लेखन
मराठी विज्ञान परिषद, वसंत व्याख्यानमाला, संग्रहालयांनी चालवलेल्या शास्त्रीय व्याख्यानमाला अशा अनेक ठिकाणी त्यांनी त्यासाठी अनेक व्याख्यानं दिली. अनेक छोट्या पुस्तकांतून, पुस्तिकांतून रंजक भाषेतून, रोजची उदाहरणं देऊन त्यांनी मुलामुलींना विज्ञानाची गोडी लावली. मुलांना जगाविषयीच्या ज्ञानाचा आनंद समजावा, आपणहून प्रश्न विचारण्याची आणि उत्तरं शोधण्याची गंमत कळावी म्हणून बाबा मुलांसाठी शब्दकोडी, गणिती कोडी, सामान्यज्ञान कोडी तयार करत राहिले. ( Prabhakar Sovani )
मातृभाषेतून शिक्षण दिलं, तर खूप लहानपणापासून जगाची चांगली ओळख करून देता येते, यावर त्यांचा विश्वास होता. ओळखीची, रोजच्या अनुभवातली उदाहरणं दिल्याने ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला विषय पटकन समजायचा, कायम लक्षात राहायचा. ( Prabhakar Sovani )
याच गुणामुळे ते विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. भूशास्त्राचं शिक्षण घेताना ‘अॅमिग्डेलॉइड बेसाल्ट’ ही संज्ञा वाटेत भेटते. फार पूर्वी भूगर्भातून लाव्हा उसळला नि तो पृष्ठभागावर येऊन थंड झाल्यावर डोंगर, जमीन बनले. सह्याद्री ‘बेसाल्ट’ या प्रकारात मोडतो. त्यात कुठे कुठे ‘अमिग्डेलॉइड बेसाल्ट’ सापडतो. लाव्हारसाबरोबर वायूही बाहेर येतात. थंड होताना अशा वायूंचे बुडबुडे दगडात राहतात. कालांतराने त्यात इतर खनिजे जाऊन बसतात. अशा दगडाचा छेद दाखवून बाबा सांगायचे, ‘शेंगदाण्याची चिक्की डोळ्यांसमोर आणा. गुळाचा थिजलेला पाक म्हणजे हा बेसाल्ट. शेंगदाणे म्हणजे त्यात विखुरलेले खनिजांचे गुंडगुळे.’
निरंजन घाटेंचे गुरू
बाबा निवृत्त झाल्यावर त्यांचे विद्यार्थी निरंजन घाटे यांनी एक लेख लिहिला होता. त्यात भूशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या ‘फील्ड ट्रिप्स’च्या आठवणी होत्या. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी विद्यार्थी-शिक्षक सिनेमाला जायचे. पडद्यावर रोमँटिक गाणं चालू असताना बाबा सांगायचे, ‘पाहिलंत का, गेल्या कडव्यात हिरो बेसाल्टवर नाचत होता, तो आता सँडस्टोनवर आलाय!’ ( Prabhakar Sovani )
त्यांचे समानधर्मा, समवयस्क मित्र आणि त्यांचे विद्यार्थी, पुढच्या पिढीतले वैज्ञानिक दृष्टिकोण जगणारे लेखक, शिक्षक, संपादक यांच्याबरोबर बाबांनी ‘सृष्टिज्ञान’, ‘उद्यम’ सारखी मासिकं चालवायला मदत केली. त्यांचे बॉटनिस्ट मित्र डॉ. वा. द. वर्तक आणि आघारकर संशोधन संस्थेचे डॉ. श्री. ह. गोडबोले असं त्रिकूट आसपासच्या गावांच्या शाळांत जाऊन मुलांना हसत-खेळत वैज्ञानिक दृष्टिकोण शिकवायचा प्रयत्न करीत. दिवसा मनोरंजक शास्त्रीय प्रयोग, झाडाझुडपांची ओळख नि रात्री बाबांचं आकाशदर्शन असे. ( Prabhakar Sovani )
मराठी विज्ञान परिषद, वाईचा मराठी पारिभाषिक विश्वकोश अशा अनेक ठिकाणी बाबांचा कृतिशील सहभाग होता. आ. मा. लेले, निरंजन घाटे, प्र. के. घाणेकर, डॉ. अरविंद गुप्ता, शास्त्रीय खेळणी विकणारे टुमणे पतीपत्नी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशा सर्वांशी त्यांचे कामाचे नि मैत्रीचे संबंध होते.
नोकरी करीत शिक्षण
या माणसाचा प्रवास थक्क करणारा होता. दहा मुलातलं नववं मूल. पितृछत्र लहानपणीच हरपल्याने कुटुंबाची वाताहत झालेली. तल्लख बुद्धी नि स्मरणशक्ती असूनही परिस्थितीमुळे सुरळीत शिक्षण शक्य नव्हतं. नोकरी करत बाबा जिद्दीने पोस्ट ग्रॅज्युएट झाले. विद्यापीठात अव्वल आले. फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तिथे नोकरीचा प्रस्ताव मिळूनही दिलेला शब्द पाळायला टिळक-आगरकरांच्या ध्येयवादी शिक्षणसंस्थेत परत आले. लहान वयात भूशास्त्र विभाग प्रमुख झाले. डी. ई. सोसायटीचे सेक्रेटरी नि फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले. शिवाय वेळात वेळ काढून विज्ञानप्रसार चालूच होता.
‘सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख’ असं समर्थांनी बजावून ठेवलेलं आहे, पण मी कीर्ती सांगतच नाहीये. कीर्ती, प्रतिष्ठा, उच्च स्तरात ऊठबस, संपत्ती, झकपक पोशाख, दिखाऊ उधळमाधळ या बाबांच्या लेखी बिनमहत्त्वाच्या गोष्टी होत्या. ( Prabhakar Sovani )
ते रसिक होते. हातात उत्कृष्ट चित्रकला होती. संगीताची आवड नि कान होता. सुरेल गळा होता. बाजा, पेटी, तबला, बासरी ही वाद्यं अवगत होती. पैसे नसतानाही सर्व विषयांवरची पुस्तकं, कोश यांचा भिंती भरून संग्रह होता. ( Prabhakar Sovani )
बागुलबुवा नव्हते…
जेवणाच्या टेबलावर काव्यशास्त्रविनोद चालायचे. रोजच्या घटनांवर चिं. वि. जोशी यांच्या साहित्यातली चपखल अवतरणं ऐकायला मिळायची. सर्व गोष्टींचं, म्हणींचं इंग्रजीतून मराठीत भाषांतर व्हायचं. त्यामुळे ‘प्रत्येक वस्तूस आपापली जागा, त्या जागी ती वस्तू सदैव ठेवा’ असं ऐकवलं जायचं. ( Prabhakar Sovani )
अमेरिकेहून परतताना त्यांनी आपल्या दोन लहान मुलांसाठी गोष्टींची, रंगीत चित्रांची पुस्तकं आणली होती. आम्ही तेव्हा इंग्रजी वाचणं शक्यच नव्हतं. म्हणून पुस्तकांवर त्यांनी मराठी भाषांतरे लिहिली होती. उदा. ‘रुडॉल्फ द रेड नोज्ड रेनडिअर’ या गाण्याशेजारी बाबांनी ‘लालनाकी, लालनाकी, किती गमतीदार ! मुसुंब्याहून मोठे, अन् फारच चमकदार !’ असं लिहिलं होतं.
बाबा हा घरातला बागुलबुवा नव्हते. प्रेम नि आदर असला तरी वचक, जरब, दहशत, भीती नव्हती. आम्ही एकत्र आकाशकंदील बनवायचो. दिवाळीचा किल्ला नि त्यापुढेच गाव बनवायचो. रात्री डार्करूममध्ये बाबांनी काढलेले फोटो डेव्हलप करायला मदत करायचो. रात्री आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचे राष्ट्रीय कार्यक्रम ऐकायचो. ( Prabhakar Sovani )
आकाशदर्शन
केव्हा केव्हा ते रात्री आम्हाला झोपेतून उठवून जवळच्या टेकडीवर घेऊन जायचे नि आकाशातल्या नवलाच्या गोष्टी दुर्बिणीतून दाखवायचे. पिधान, युती, ग्रहण, धूमकेतू, आकाशगंगा, सर्व नक्षत्रं आणि ठळक तारे पाहिलेले आठवतात. ( Prabhakar Sovani )
खडतर आयुष्याबद्दल खंत, कटुता त्यांच्या बोलण्यात कधीच नव्हती. आम्हाला त्यांनी निवांत, आनंदी, सुरक्षित बालपण दिलं. आमच्या शहाणपणावर विश्वास टाकून आमचे निर्णय आम्हाला घेऊ दिले, पण सतत भक्कम पाठिंबा दिला. विचारविनिमय करायची जागा हा भरवसा दिला.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचारांचं शिक्षण घेऊन मी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. मी एकटीच होते नि भोवती असंख्य पर्याय होते. भांबावून जायला व्हायचं. मोबाइल, व्हिडियो कॉल वगैरेच्या आधीचा काळ. तेव्हा मी लांबलचक पत्रं लिहून माझे संभ्रम, गोंधळ घरी कळवायची. काय नि का करावंसं वाटतंय ते लिहायची. उलट टपाली बाबांचं पत्र यायचं. त्यातल्या ‘तुझा विचार सर्वथैव योग्य आहे’ या एका वाक्याने धीर यायचा; पुढे जायला बळ यायचं.
ते काळाच्या पुढे होते. सर्व वस्तूंचा जपून सांभाळा, दुरुस्ती, पुनर्वापर अशी त्यांची पर्यावरणपूरक जीवनशैली होती. अंधश्रद्धांना स्थान नव्हतं. सर्व गोष्टींची परखड चिकित्सा करून मगच स्वीकार व्हायचा. ( Prabhakar Sovani )
आमचा इंपोर्टेड उपास
बाबांची आई (ताई) आमच्याकडे राहायच्या. त्या होत्या तोवर घरात देवघर होते, देवपूजा होती, लोणी-खडीसाखरेचा मस्त नैवेद्य होता. बाबा त्याआड कधी आले नाहीत. पण ताई गेल्यावर देव गुंडाळून ठेवले गेले. माणुसकी हा एकच धर्म बाबांना मान्य होता. विवेकवादी, विज्ञानाच्या पायावर बेतलेली समतोल जीवननिष्ठा होती.
पुढे त्यांनी ‘दगडातला देव आणि देवातले दगड’ असा एक छान लेख लिहिला. आमच्या देवांमध्ये एक गणपतीचा लाल दगड होता. हा गंडकी नदीच्या प्रवाहात घासून गुळगुळीत झालेला असतो; शंकराची स्फटिकाची पिंड कुठून येते; दत्ताच्या पादुका कुठल्या; नरम दगडावर कोरीव काम करून बनवलेल्या असतात वगैरे माहिती लेखात होती.
‘अंतर्नाद’ मासिकात त्यांचा ‘आमचा इंपोर्टेड उपास’ हा असाच एक स्वच्छ नजरेने परंपरांकडे बघणारा गमतीदार लेख होता. उपासाच्या दिवशी काय खायचं; काय वर्ज हे नियम हजारो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी घालून दिलेले आहेत, अशी समजूत असते. प्रत्यक्षात ही पोटाला नि पचनसंस्थेला विश्रांती द्यायची योजना होती. पण हुशार माणसांनी ‘जे जे निषिद्ध म्हटलेलं नाही, ते चालेल’ असा तर्क लढवला. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज अशांबरोबर भारतात आलेले बटाटे, शेंगदाणे, साबुदाणा, मिरची चालेल असं ठरवलं आणि ‘एकादशी दुप्पट खाशी’ असं स्वरूप बनलं !
परखड चिकित्सा
कुठेही अंधश्रद्धा, अवैज्ञानिक भोंगळपणा दिसला की बाबा त्याची परखड चिकित्सा करायचे. ‘किर्लोस्कर’ मासिकात गो. नी. दांडेकरांचा ‘बहुरत्ना वसुंधरा’ हा लेख आला. सुरेख वर्णनं, हातखंडा शैली असा अत्यंत वाचनीय लेख. पण त्यात सह्याद्रीतल्या भटकंतीत सापडलेल्या गोमेद, वैडुर्य, पुष्कराज, मार्जारनेत्री वगैरे रत्नांचा उल्लेख होता. भूशास्त्रीय दृष्टीने त्यातली काही सह्याद्रीच्या जडणघडणीत बनणं, असणं अशक्य होतं. तसं टिपण बाबांनी पाठवलं, ते छापून आलं. त्यावर गोनीदांची प्रतिक्रिया आली, ‘सोवन्यांनी वाट्टेल ते म्हणावं. निसर्ग हा चमत्कार करणारा जादूगार आहे!’ इथे भावनिक नि वैज्ञानिक हा फरक स्पष्ट झाला !
परंपरावादी, पुनरुज्जीवनवादी विचारांच्या लाटेत ‘वास्तू’, ‘ज्योतिष’ यापुढे ‘शास्त्र’ चिकटवून वैज्ञानिक पायाचा आभास निर्माण केला जातो. आमच्या ऋषींकडे दिव्य दृष्टी होती, संजीवनी होती, पुष्पक विमान होतं, गणपती म्हणजे ऑर्गन ट्रान्स्प्लांट वगैरे घोषणा उच्चरवात ठासून सांगितल्या जातात तेव्हा बाबांसारख्या तत्त्वनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, धैर्यवान माणसांचं महत्त्व अधोरेखित होतं !
(संपर्क: sowani.a@gmail.com)
1 comment
Comments are closed.
Add Comment