चैतन्य रुद्रभटे
फलटण : फलटणचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत. फलटण आणि बारामतीच्या विकासाचा पाया स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनी रचला होता. एव्हाना स्व. यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव येथील मुधोजी मनमोहन राजवाड्यात झाला होता. राज्याला योग्य दिशा देण्यात फलटणकर नेहमी अग्रभागी असतात. आज राज्याला पुन्हा एकदा जागेवर आणण्यासाठी फलटणकर पुढे सरसावले आहेत, असे उद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरद पवार यांनी काढले. (Ramraje Naik Nimbalkar)
सोमवार (दि.१४) रोजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटणच्या राजेगटातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, माळशिरसचे उत्तमराव जानकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटणशी जुने ऋणानुबंध
शरद पवार म्हणाले, मी आठवत होतो चार,सहा महिन्यांच्या पूर्वी मी जेव्हा फलटणला आलो होतो. तेव्हा मला आपल्याच लोकांच्यात काहीतरी फरक जाणवत होता. मी देशात सर्वत्र सभा घेतो. मला श्रोत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यावरुन त्यांच्या मनात काय चाललय, हे समजत. चार महिन्यांपूर्वी मी आलो होतो. तेव्हा तुमच्या डोळ्यात आणि मनात मला चिंता जाणवत होती. पण, तुमचे डोळेच सांगतायत तुमचं मन प्रफुल्लित आहे. माझे आणि फलटणचे संबंध जुने आहेत. मलठण येथे असलेल्या महिपतराव भोसले यांना माझी बहीण दिली आहे. त्यासोबतच आमच्या आईची राजाळे येथील जानाई देवीवर श्रद्धा होती. मी लहान असताना माझ्या आईसोबत अनेकदा तिथे येत असत. अनेक वर्षांचा माझा आणि फलटणचा ऋणानुबंध आहे. (Ramraje Naik Nimbalkar)
फलटण आणि बारामतीचा विकासाचा पाया श्रीमंत मालोजीराजेंनी रचला
बारामती आणि फलटण या दोन्हीच्यामध्ये फक्त एका नदीच अंतर आहे. फलटण आणि बारामती हे काही वेगळ नाही. आज बारामतीच चित्र वेगळ असल तरी पूर्वी स्व. श्रीमंत मालोजीराजे असताना त्यांनी या फलटण आणि बारामतीतील साखर कारखानदारीचा पाया रचला आहे. स्वातंत्र्योत्तरकाळात आमचं काही सरकारी काम असेल तर आम्ही थेट फलटणला श्रीमंत मालोजीराजे यांच्याकडे यायचो. या भागाचा विकासाचा पाया रचण्यात श्रीमंत मालोजीराजे यांचे मोठे योगदान आहे, हे विसरुन चालणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय फलटणच्या राजवाड्यात
आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली होती. संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठीची ही चळवळ उभी झाली होती. त्यात फलटण अग्रभागी होते. या चळवळीत कॉम्रेड स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्यासारखा नेता फलटणचा आमदार म्हणून निवडून गेला होता, हे विसरुन चालणार नाही. या चळवळीचा इतिहास बघितला तर यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करावे, असा निर्णय जेंव्हा झाला आणि त्यावेळेस जो ठराव केला गेला तो फलटणच्या मुधोजी मनमोहन राजवाड्यात झाला होता. त्यामुळे हे मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात फलटणच जे योगदान आहे, ते कदापि कोणीही विसरु शकत नाही. आज पुन्हा एकदा असाच नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी फलटणच्या राजघराण्यातील नव्या पिढीनेही अशीच भूमिका घेतली आहे, याचे कौतुक असल्याचे पवार यांनी सांगितले. (Ramraje Naik Nimbalkar)
लोकसभा निवडणुकीनंतर बहिण लाडकी कशी?
आज महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा, हे आपण ठरवायचं आहे. दररोज वर्तमानपत्र उघडलं तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजनांची माहिती दिसत आहे. सध्या सरकारला कधी बहिणींच्या बद्दल आस्था दिसून येते. कोणत्याही भावाला आपल्या बहिणींच्या बद्दल आस्था असतेच. बहिणींचा सन्मान केला तर मलाही अभिमान आहे. पण, गंमत अशी आहे की जेंव्हा गेले दहा वीस वर्ष बहिण कशी दिसली नाही. नंतर सुद्धा सत्ता होती. त्यावेळेस बहिण दिसली नाही. बहिण दिसली कधी तर लोकसभेला महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी आम्ही ३१ जागा जिंकल्यानंतर या सरकारला बहिण दिसली. याचा अर्थ काय? असा सवाल शरद पवार यांनी केला.
कायदा आणि सुव्यवस्थेत राज्यकर्ते नाकाम
तुम्ही लोक हुशार आहात. बारामतीत १ लाख ६० हजार मतांनी आपल्या बहिणीला निवडून दिलं. आजही विधानसभा निवडणुकीत या महाराष्ट्रातील सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे. एकीकडे बहिणींचा सन्मान करतात पण दुसरीकडे आपल्या बहिणी सुरक्षित आहेत का? हे तुम्हीच ठरवा. राज्यात आपल्या बहिणी सुरक्षित नाहीत. काल मुंबईत काँग्रेसच्या माजी मंत्र्याची हत्या झाली. राज्यातल्या कायदा आणि व्यवस्थेची पुरती वाट लागली आहे, हे दिसत आहे. राज्यकर्ते कमी पडतायेत हे स्पष्ट दिसत आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील हात बरबटलेले
सिंधुदुर्ग येथे या सरकारने छ्त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. त्याच्या उद् घाटनाला स्वतः देशाचे प्रधानमंत्री आले होते. पण, तो पुतळा कोसळला, यासारखं दुर्दैव नाही. या पुण्यात शिवाजी मिल्ट्री स्कूलमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा १०० वर्षापूर्वीचा आहे. मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाच्या इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला ७० वर्ष झाली तरी हे पुतळे आजही दिमाखात उभे आहेत. सिंधुदुर्ग येथील पुतळा का कोसळला याबाबत चौकशी झाली तर जोराच वार आल म्हणून हा पुतळा पडला, अस सांगण्यात आल. पण, लोक हुशार आहेत त्यांना माहिती आहे. प्रत्येक योजनेत राज्यकर्त्यांचे हात बरबटलेले आहेत. आज त्यांच्या हातातून सत्ता काढून घेण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राला जागेवर आणण्यासाठी हा म्हातारा कायम उभा
आत्ता मी काही तरुणांच्या हातात बोर्ड बघितले ८४ वर्षांचा म्हातारा म्हणून त्यावर उल्लेख होता. तुम्ही काही काळजी करु नका. हा म्हातारा ८४ वर्षांचा असू किंवा ९० वर्षांचा असू आज या महाराष्ट्राला योग्य दिशा देण्यासाठी कायम हा म्हातारा प्रयत्नशील राहणार आहे, हे मात्र निश्चित. आज फलटणला वाजलेली तुतारी सबंध सातारा जिल्ह्यात परिवर्तन घडवेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, उत्तमराव जानकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमंत संजीवराजे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. आभार जयकुमार इंगळे यांनी मानले.
जसा देव दिसत नाही; तसा ‘राम’ व्यासपीठावर नाही : जयंत पाटील
लोकसभेच्या निकालानंतर आम्ही नेहमी सांगत आहोत, भारतीय जनता पार्टीत ‘राम’ राहिलेला नाही. जिथे जिथे रामाची मंदिरे आहेत तिथे तिथे त्यांचा पराभव झालेला आहे. रामाने भारतीय जनता पक्ष सोडलाय. तसा आपल्या रामानेही त्यांची संगत सोडली आहे. आपला ‘राम’ देखील आपल्या सोबतच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. देव जसा आपल्याला कधी दिसत नसतो तसा आपला ‘राम’ आत्ता या व्यासपीठावर दिसत नाही, असे म्हणत आमदार जयंत पाटील यांनी श्रीमंत रामराजे यांच्या अनुपस्थितीवर भाष्य केले.
हेही वाचा :