कार्यकर्ते पोरके 

Party workers have been left orphaned

राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि दादांचा मला फोन आला. “रवी, तू कुठे आहेस? माझ्यासोबत चल. मी सोडून तुला कुणी नाही. वेडेपणा करू नकोस.” तेव्हा मी दादांसोबत गेलो नाही आणि पवार साहेबांसोबत राहिलो. परंतु यामुळे दादा आणि माझ्या नात्यात कधीच कटुता आली नाही. त्यांचा मायेचा स्पर्श आणि ओलावा मी अगदी २५ वर्षांचा असल्यापासून अनुभवलाय.

रविकांत वर्पे 


अगदी अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी पिंपरी-चिंचवड- पुण्यात पुन्हा एकदा दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. आताही त्यांच्यात मला तेच जुने दादा दिसले. तोच करारीपणा, तोच दरारा, तीच स्टाईल.
मी तेव्हा २५ वर्षांचा होतो. माझ्याकडे अजितदादांच्या मीडिया समन्वयाची जबाबदारी होती. राज्यातील आणि देशातील माध्यमांसाठी मुलाखतींचे नियोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या काळात डिजिटल माध्यमांचा फारसा प्रसार नव्हता. दादांचे मुलाखतीचे वेळापत्रक ठरवताना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी वेळेचे नियोजन करणे माझ्यासाठी मोठी कसरत असायची. (Party workers have been left orphaned)
यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम आखणे. दादा म्हणजे सकाळी लवकर उठून काम करणारे व्यक्तिमत्त्व. माध्यम क्षेत्रातील लोकांना सहसा रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यामुळे पत्रकार बहुतेक वेळा सकाळी मुलाखत किंवा बाईटसाठी नकार देत. पण दादा म्हटले की पत्रकारांना सकाळी यावेच लागायचे.
दादांनी सकाळी सात वाजता वेळ दिली, तर आम्हाला किमान एक तास आधी तयार राहावे लागायचे. तरीही दादा मंत्रालयातील काम पाहून एका दिवसात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मुलाखती आणि बाईट्स पूर्ण करायचे. त्यांनी कधी मंत्रालयातील कामामुळे मुलाखती चुकवल्या नाहीत आणि मुलाखतींसाठी कधी मंत्रालयाकडे पाठ फिरवली नाही.या काळात दादांसोबत खूप जवळून काम करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची संधी मिळाली.
गुरुवार म्हणजे दादांचा जनता दरबार. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्यांना ते आवर्जून वेळ द्यायचे. कुणाचे काही काम अडले असेल, तर तिथूनच संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांना फोन जायचा. दादांकडे आलेले कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे किंवा सामान्य नागरिकांचे निवेदन कधीही हरवले नाही. त्या प्रत्येक निवेदनावर योग्य ती कारवाई व्हायचीच. (Party workers have been left orphaned)

इतका तगडा अनुभव असलेला नेता असूनही राज्याचे आयुक्त, प्रधान सचिव किंवा अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या बैठकींना जाताना दादा नेहमी अभ्यास करून, पूर्ण तयारीनिशीच जायचे. त्यांनी विकासाचे राजकारण पूर्णवेळ केले.
प्रशासनाची उत्तम जाण, नागरिकांच्या समस्यांची सखोल माहिती आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला नेता म्हणजे आमचे दादा. स्वच्छता आणि शिस्त म्हणजे दादा. कडक स्वभावाचे, पण तितकेच संवेदनशील. दादांचे कार्यकर्ते कधीच एकाच पठडीतले नसायचे. त्यांच्या भोवती वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे होती आणि ती दादांना आवडायची. (Party workers have been left orphaned)

पण दादांच्या अचानक जाण्याने माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी पोरकं केलं. आता कुठल्याही नेत्याच्या सभांना टाळ्या आणि शिट्ट्या होणार नाहीत. आता सभेत कुणी कार्यकर्त्यांची फिरकी घेणार नाही. आता सभेच्या ठिकाणी “एकच वादा, अजित दादा” अशा घोषणा होणार नाहीत. सभेच्या स्टेजवर गॉगल घातलेले दादा घोषणांच्या गर्जनात येताना दिसणार नाहीत. आता फोन वाजला की, “नमस्कार, मी अजित पवार बोलतोय,” हा आवाज ऐकू येणार नाही…

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

आपले घर, आपला किल्ला !

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या