देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालला पाहिजे

प्रयागराज : देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल, असे म्हणण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी रविवारी (८ डिसेंबर) केली. (Shekhar Kumar Yadav)

प्रयागराज येथे विश्व हिंदू परिषदेच्या ‘लिगल सेल’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘समान नागरी संहितेची घटनात्मक आवश्यकता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

‘हा हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानात राहणाऱ्या बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार देश चालेल, असे म्हणण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. हा कायदा आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्याने तुम्ही असे म्हणत आहात, असे तुम्हाला वाटेल, पण तसे नाही. खरे तर, कायदा बहुमतानुसार काम करतो. हाच निकष कुटुंब किंवा समाजाच्या संदर्भात लावून बघा. बहुसंख्य लोकांच्या कल्याणासाठी ज्या गोष्टीमुळे फायदा होईल तेच स्वीकारले जाते,’ असे न्या. यादव म्हणाले.

न्यायमूर्ती यादव यांचे हे भाषण ‘लाइव्ह लॉ डॉट इन’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हिंदू धर्मात असलेल्या अस्पृश्यता, सती आणि जोहार यांसारख्या प्रथा नाहीशा करण्यात आल्या. मात्र मुस्लिम समुदायांमध्ये बहुपत्नीत्त्वाची प्रथा आजही लागू आहे. ती अस्वीकार्य आहे, असे न्यायमूर्ती यादव यावेळी म्हणाले.

शास्त्र आणि वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये महिलांना देवी म्हणून पुजले जाते. त्यांच्यातील (मुस्लिम समाज) पुरुषांना मात्र अनेक बायका करण्याचा, हलालाचा किंवा तिहेरी तलाकचा हक्क आहे, ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. (Shekhar Kumar Yadav)

शपथपूर्वक सांगतो, देशात एकच कायदा अस्तित्वात येईल…

‘आमच्या शास्त्रांमध्ये आणि वेदांमध्ये देवी म्हणून सन्मान असलेल्या स्त्रीचा तुम्ही अनादर करू शकत नाही. तुम्ही (मुस्लिम) चार बायका करण्याचा, हलाला करण्याचा किंवा तिहेरी तलाकचा हक्क सांगू शकत नाही. तुम्ही म्हणता की, आम्हाला तो अधिकार आहे आणि महिलांची जबाबदारी मात्र नको, हे चालणार नाही. समान नागरी संहितेचा पुरस्कार केवळ विहिंप, आरएसएस करत नाही तर देशाचे सर्वोच्च न्यायालय देखील याबद्दल बोलत आहे. न्यायालयाचा हा ऐतिहासिक लायब्ररी हॉल आहे. येथे अनेक दिग्गजांची भाषणे झाली आहे. मीही येथे केवळ बोलतच नाही तर शपथ घेऊन सांगतो की, देशात निश्चितपणे एकच कायदा लवकरच अस्तित्वात येईल,’ असा ठाम विश्वास न्यायमूर्ती शेखर यादव यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या देशात एकच राज्यघटना आणि दंडात्मक कायद्यांचा एक संच आहे. त्यामुळे नागरी कायदेही एकत्र केले जावेत, हेच तर्कसंगत आहे, यावर न्या. यादव यांनी भर दिला.

गाय, गंगा आणि गीता

आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभीच त्यांनी गाय, गंगा (गंगा नदी) आणि गीता हे भारतीय संस्कृतीचे भाग आहेत. ज्या देशात गंगा वाहते त्या देशाचे आम्ही नागरिक आहोत, हीच आमची खरी ओळख आहे, असे सांगितले.

जो माणूस गंगेत डुबकी मारतो किंवा चंदन लावतो तो हिंदू, अशी मर्यादित व्याख्या करता येणार नाही. मात्र जो या भूमीला आपली माता मानतो, तसेच जे लोक कुराण किंवा बायबलवर विश्वास ठेवतात. मात्र संकटकाळात आपल्या धार्मिक प्रथा किंवा विश्वास बाजूला ठेवून देशासाठी प्राण द्यायला तयार असतात, तेही हिंदूच असेही ते म्हणाले. (Shekhar Kumar Yadav)

मुस्लिमांनी देशाच्या संस्कृतीचा अनादर करू नये…

आपल्या हिंदू धर्मातही बालविवाह, सती प्रथा, मुलींची हत्या यांसारख्या अनेक कुप्रथा होत्या, परंतु राजाराम मोहन रॉय यांच्यासारख्या सुधारकांनी या प्रथा बंद करण्यासाठी लढा दिला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तथापि, हलाला, तिहेरी तलाक आणि दत्तक संबंधित मुद्द्यांविरोधात उभे राहण्याचे धाडस मुस्लिम समाजातून कुणी केलेले नाही. किंवा त्यांच्यातून कुणी त्यासाठी पुढाकार ही घेतलेला नाही. मुस्लिमांनी अग्निभोवती सात फेरे घेऊन लग्न केले पाहिजे किंवा गंगेत डुबकी मारली पाहिजे वा चंदन लावणे अपेक्षित नाही. मात्र, त्यांनी या देशाच्या संस्कृतीचा, महान व्यक्तिमत्त्वांचा आणि या भूमीतील देवांचा अनादर करू नये, अशी अपेक्षाही न्यायमूर्ती यादव यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले