Night witches in war: लाकडी विमानानं युद्ध करणाऱ्या ‘त्या’ दोघी

Night witches in war

जर्मन सैन्यासाठी त्या होत्या नाईट विचेस. रात्रीच्या अंधारा काही कळायच्या आतच त्या जर्मन सैन्यावर बॉम्बहल्ला करून पसार होत. तेही लाकडी विमानांतून. त्यांनी शत्रूची अक्षरश: झोप उडवून टाकली. महत्त्वाकांक्षी वैमानिक आणि जिवलग मैत्रिणी पोलिना गेलमन आणि गॅल्या डोकुटोविचयांची ही कहाणी…(Night witches in war)

दुसरे महायुद्ध विलक्षण शौर्यकथांनी भरलेले आहे. यातील अज्ञात नायकांच्या कामगिरीचे श्रेय त्यांना गेलेलेच आहे असे नाही. बीबीसी रेडिओ ४ चा हिस्ट्रीज सीक्रेट हिरोज पॉडकास्टमध्ये मात्र अशा अज्ञात युद्ध नायकांची दखल घेतली आहे. हेलेना बोनहॅम कार्टर या पॉडकास्टच्या निवेदिका आहेत. बीबीसीच्या ‘हिस्ट्रीज सीक्रेट हिरोज’ पॉडकास्टचा नवा भाग याच नाईट विचेसवर आधारीत आहे.

तर अशाच एका भागातील रोमांचक शौर्यकथेतील या दोन नायिका. काळ्याकभिन्न रात्री उड्डाण करणाऱ्या आणि गुप्त बॉम्बहल्ला मोहिमा पार करणाऱ्या रशियन महिला वैमानिकांच्या एका स्क्वॉड्रनमधील या कर्तृत्ववान महिला.

जर्मन लोक या महिलांना डाय नॅच्ट हेक्सेन किंवा नाईट विचेस म्हणत. हा वैमानिक, नेव्हिगेटर, ग्राउंड क्रू आणि मेकॅनिक्सचा एक उच्चभ्रू गट होता. त्यांच्या विमानचालनाची आवड आणि कर्तव्याची तीव्र जाणीव लिंगभेदातीत होती. त्यांचे कर्तृत्व आणि चातुर्य अतुलनीय होते. (Night witches in war)

या स्क्वाड्रनमधील पोलिना गेलमन आणि गॅल्या डोकुटोविच या महत्त्वाकांक्षी वैमानिक आणि जिवलग मैत्रिणी. दोघींनी तरुणपणीच उड्डाण शिकले होते. प्रसिद्ध सोव्हिएत वैमानिक मरीना रास्कोवा यांना महिला फ्लाइंग युनिट्समध्ये महिलांना भरती करण्याचा आदेश ऑक्टोबर १९४१ मध्ये देण्यात आला. तेव्हा या दोघींनी संधी साधली. यात भरती झालेला गटच पुढे नाईट विचेस (रात्र चेटकिणी) म्हणून (जर्मन सैन्याकडून) ओळखला जाऊ लागला. (Night witches in war)

इतिहास संशोधक आणि ‘अ‍ॅव्हेंजिंग एंजल्स: सोव्हिएत वुमन स्निपर्स ऑन द ईस्टर्न फ्रंट (१९४१-४५)’ या पुस्तकाच्या लेखिका ल्युबा विनोग्राडोवा सांगतात, ‘‘प्रचंड उत्साह आणि साहसाची जबरदस्त इच्छा असलेल्या त्या दोघींना उड्डाणाचे अक्षरश: वेड होते. विशेष म्हणजे त्या अत्यंत कडव्या देशभक्त होत्या. म्हणूनच त्या दोघी स्वेच्छेने यात सहभागी झाल्या होत्या.’’

त्यांची कमांडर रास्कोवा ही त्यांच्यासाठी प्रेरणा होती. ‘‘ रास्कोवा त्या काळातील एक महान सेलिब्रिटीच होती. तिचे नाव, तिचे फोटो, तिचा चेहरा [देशभर] प्रसिद्ध होता. ती एक आदर्श होती. महिला अशा प्रकारच्या उड्डाणासाठी पूर्णपणे सक्षम आहेत हे दाखवून देणारी एक सक्षम महिला होती,’’ विनोग्राडोवा सांगतात.

मर्यादा हीच बनली शक्ती

रशियातील एंगेल्सजवळील व्होल्गा नदीजवळ ‘नाईट विचेस’ना प्रशिक्षण देण्यात येत असे. त्यांना साधारणपणे तीन वर्षांचे प्रशिक्षण केवळ तीन महिन्यांत पूर्ण करावे लागले. या दोघींना वैमानिक म्हणून निवडले गेले नाही तर नेव्हिगेटर म्हणून निवडले गेले. त्यामुळे सुरुवातीला डोकुटोविच निराश झाली. पण नंतर तिला उड्डाणाची परवानगी मिळाली. नेव्हिगेटरची जबाबदारी दिल्यानंतरही ती अधिक सकारात्मक झाली. तिने हा अनुभवही लिहून ठेवलाय. ती लिहिते, ‘‘नेव्हिगेटर असणे किती रोमांचक आहे ते मला आता समजले! जेव्हा तुम्ही थोडेसे उड्डाण करता तेव्हा तुम्ही स्वप्नात फिरता आणि पुन्हा आकाशात उड्डाणाची इच्छा अनावर होते.’’ (Night witches in war)

सोव्हिएत सैन्याकडे विमानांची कमतरता होती. त्यामुळे महिलांना लाकडी Po-2 विमाने देण्यात आली. अर्थातच ती युद्धासाठी योग्य नव्हती. सामान्यतः कीटकनाशक फवारणी करण्यासाठी ती वापरली जात. त्यांना बंदुका, रेडिओ किंवा पॅराशूटही दिले जात नव्हते. त्यामुळे या विमानातून त्यांनी बॉम्ब वाहून न्यायला प्राधान्य दिले.

जेव्हा त्यांच्या विमानांचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी त्यांच्या या मर्यादांचाच फायदा करून घेण्याचा निश्चय केला. Po-2s क्वचितच आवाज करत असत. रेडिओ स्थानाद्वारे त्यांचा मागोवाही घेता येत नसे आणि खूप लहान असल्यामुळे ती इन्फ्रारेड लोकेटरवरही दिसत नसत. त्यामुळे या महिला जर्मन प्रदेशावरून उड्डाण करू शकत. काळी वेळ इंजिन बंद करून पुढे सरकत आणि शत्रूला पत्ता लागायच्या आत बॉम्बफेक करून माघारी फिरत. (Night witches in war)

विनोग्राडोवाच्या मते, त्यांच्या कारवायांचा वेग प्रचंड होता. ‘‘दर चार मिनिटांनी एक विमान उड्डाण करत असे, लक्ष्यावर बॉम्बफेक करत असे आणि मागे वळत असे, लगेच दुसरे विमान त्यांची जागा घेत असे.’’

बॉम्बफेक कुठून होतेय हे लक्षात येत नसल्याने नाईट विचेसच हे कृत्य करत आहेत, अशा दंतकथा जर्मन लोकांनी पसरवल्या. एक अलौकिक शक्ती आहे ती बॉम्बफेक करते, असा समज पसरवला गेला. तसेच त्यांना डाय नॅच्ट हेक्सेन किंवा नाईट विचेस असेही म्हटले जाऊ लागले. त्यांच्या युक्त्यांमुळे असे वाटे की त्या दिसू शकतात आणि कोणताही मागमूस न ठेवता अदृश्य होऊ शकतात.

नाईट विचेसच्या विजयामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. १९४३ मध्ये ते अधिकृतपणे फोर्टी-सेह्थ गार्ड्स नाईट बॉम्बर एव्हिएशन रेजिमेंटची स्थापना झाली. तथापि, जुलै १९४३ मध्ये, जर्मन लोकांनी एका नवीन युक्तीने वैमानिकांना आश्चर्यचकित केले. त्यांनी त्यांच्या विमानविरोधी तोफा शांत ठेवल्या. त्याऐवजी या बॉम्बर्सवर रात्रीच्या वेळी लढाऊ विमानाने हल्ला केला. अशाच एका हल्ल्यात ३१ जुलै रोजी डोकुटोविच आणि तिच्या सात सहकारी ‘‘विचेस’’ मारल्या गेल्या. ‘‘ या रेजिमेंटच्या संपूर्ण इतिहासातील कदाचित ही सर्वांत वाईट रात्र,’’ असे या घटनेचे वर्णन विनोग्राडोवा करतात. तरीही, मे १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी विजयाची घोषणा करेपर्यंत या रेजिमेंटमधील महिला लढत राहिल्या.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात रेड आर्मीमधील पूर्णपणे महिला असलेली एकमेव युनिट म्हणून ओळखली जाणारी ही रेजिमेंट ऑक्टोबर १९४५ मध्ये अधिकृतरित्या बरखास्त करण्यात आली. नंतर गेलमन मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेसमध्ये सामील झाली. तिने आपल्या मृत मैत्रिणीचे नाव आपल्या मुलीला दिले. गॅल्या असे तिचे नाव ठेवले. (Night witches in war)

२००५ मध्ये गेलमनचे निधन झाले. तिने आयुष्याच्या शेवटी तिने या लढाऊ वैमानिक महिला इतक्या का यशस्वी झाल्या हे सांगताना, त्यांनी त्यांची कर्तव्ये स्वेच्छेने पार पाडली म्हणूनच यशस्वी झाल्या, अशा भावना व्यक्त केल्या. इतिहास संशोधक रीना पेनिंग्टनशी बोलताना गेलमन म्हणाल्या होत्या, ‘‘स्वेच्छेने या मोहिमेत त्या सहभागी झाल्या होत्या आणि कर्तव्यभावनेपेक्षा थेट हृदयाने केलेल्या आवाहनामुळे ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडता येते. आमच्या बाबतीतही तेच म्हणता येईल.’’
(सौजन्य : बीबीसी)

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

आपले घर, आपला किल्ला !

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी