न्यूझीलंडचा संघ अडचणीत

ख्राइस्टचर्च, वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये अडचणीत सापडला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात घेतलेल्या १५१ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची अवस्था शनिवारी दुसऱ्या डावामध्ये ६ बाद १५५ अशी झाली होती. न्यूझीलंडकडे ४ धावांची नाममात्र आघाडी असून कसोटीचे दोन दिवस अद्याप शिल्लक आहेत.

तिसऱ्या दिवशी, केन विल्यमसन वगळता न्यूझीलंडचे अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पहिल्या डावामध्ये ९३ धावा करणाऱ्या विल्यमसनने दुसऱ्या डावामध्ये ८६ चेंडूंत ७ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. त्याने डॅरेल मिचेलसोबत ६९ धावांची भागीदारीही रचली. विल्यमसन बाद झाल्यानंतर मात्र, पुन्हा न्यूझीलंडचा डाव गडगडला. खेळ थांबला, तेव्हा मिचेल ३१, तर नॅथम स्मिथ १ धावेवर खेळत होते. इंग्लंडच्या ख्रिस वोक्स आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव ४९९ धावांत आटोपला. शुक्रवारी शतक झळकावणारा हॅरी ब्रुक १९७ चेंडूंमध्ये १५ चौकार व ३ षटकारांसह १७१ धावा करून बाद झाला. कर्णधार बेन स्टोक्सने, तळातील गस अटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांच्यासोबत उपयुक्त भागीदाऱ्या रचून इंग्लंडला पाचशे धावांच्या आसपास पोहचवले. स्टोक्सने १४६ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ८० धावा फटकावल्या. अटकिन्सनने ४८, तर कार्सने ३३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने ४, आणि नॅथन स्मिथने ३ विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – पहिला डाव ३४८ आणि दुसरा डाव ४९ षटकांत ६ बाद १५५ (केन विल्यमसन ६१, डॅरेल मिचेल खेळत आहे ३१, रचिन रवींद्र २४, ख्रिस वोक्स ३-३९, ब्रायडन कार्स ३-२२) विरुद्ध इंग्लंड – पहिला डाव १०३ षटकांत सर्वबाद ४९९ (हॅरी ब्रुक १७१, बेन स्टोक्स ८०, ऑली पोप ७७, मॅट हेन्री ४-८४, नॅथन स्मिथ ३-१४१).

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत