मुंबई : विशेष प्रतिनिधी : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिक जवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तिर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.(Nashik KumbhMela)
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात त्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी कुंभमेळ्यात वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधूग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगिकक विकास कामे आदींबाबतचा आढावा घेतला. (Nashik KumbhMela)
नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरीडॉरची निर्मिती करून नाशिक रीलिजिअस हब म्हणून विकसित करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. नाशिक येथे साधूग्रामसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमीन संपादित करण्यात यावी. येथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत, अशा ठिकाणी तत्काळ अतिक्रमण हटवावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ज्या ज्या अडचणी येत असतील, त्या अचडणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत. साधूग्रामकरिता संपादित केलेल्या जागेवर वृक्षतोड न करता साधुंच्या निवासाची व्यवस्था करावी. मुबलक प्रमाणात प्रसाधन गृहे तयार करण्यात यावीत. (Nashik KumbhMela)
बैठकीला जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सविव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
नवे सरकार स्थापन करणार!