फडणवीस मुख्यमंत्री होताच माझे उपोषण सुरू : जरांगे

मुंबईः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला, की मी पुन्हा उपोषणाला बसलोच समजा. तुम्ही पुन्हा या, मी पुन्हा उपोषणास बसतो. काय व्हायचे ते बघू या. आपल्यापाशी सुट्टी नाही, असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील म्हणाले, की यापूर्वीही तेच होते. दुसरे कोणी नव्हते. मराठे सगळ्यांशी खेटले आहेत. मराठ्यांपुढे कोणीही सत्ताधारी नाही. मी मराठ्यांची पोर मोठे करण्याचा ध्यास घेतला आहे. आरक्षण देण्याचे वचन समाजाला दिले आहे. पडणारे पडले, निवडून येणारे आले. आपण त्यांचे संसार मोठे केले. आम्ही पडलेला आणि निवडून आलेला दोघांनाही मतदान केलेले आहे. आता या दोघांनी मराठ्यांच्या गोरगरीब पोरांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे.

राज्यात कोणाचेही सरकार आले, तरी मराठ्यांना काही टेन्शन नाही. कारण कोणीही आले तरी आम्हाला लढावेच लागणार आहे. मागच्या सरकारमध्ये तेच होते. या सरकारमध्ये तेच आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचे काही सोयरसुतक नाही. आता देशात झाले नाही, असे सामूहिक उपोषण आपण करणार आहोत. आता मराठ्यांचा नाद करायचा नाही. मराठ्यांच्या मनगटात बळ आहे. त्यांच्यात रग आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाईल. तुम्ही आहेतच किती? तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आपल्याकडून बोलत नाहीत. यामुळे मराठ्यांना लढावेच लागणार आहे. हे दोन्ही बोलत नाहीत, म्हणूनच आम्हाला उमेदवार उभे करून त्यांचा सुपडा साफ करायचा होता; परंतु आमचे समीकरण जुळले नाही. तसेच निवडणूक एकाच जातीवर निवडून येणे शक्य नव्हते; परंतु माझ्या मराठ्याशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. मराठे गप्प आहेत. शांत आणि संयमी आहेत; परंतु त्यांच्यात भयंकर आग धुमसते आहे. ताकदसुद्धा आहे. मराठ्यांना खेटण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ