नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अठराव्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सला चुरशीच्या सामन्यामध्ये १३ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यामुळे आयपीएलच्या रेकॉर्डबुक्समध्ये काही नव्या विक्रमांची भर पडली. अशाच काही रोचक आकडेवारीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप. (Mumbai Indians)
१५–० – मुंबईने आयपीएलमध्ये २०० पेक्षा अधिक धावांचे आव्हान उभारल्यानंतर सलग पंधरावा विजय मिळवला. मुंबईविरुद्ध आतापर्यंत एकाही संघास २०० पेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. २०२० च्या मोसमात राजस्थान रॉयल्सने मुंबईविरुद्ध सर्वाधिक १९६ धावांचे अव्हान यशस्वीरीत्या पार केले होते. मुंबईखालोखाल दिल्ली कॅपिटल्सने १३ वेळा यशस्वीपणे २०० पेक्षा अधिक आव्हानाचा बचाव केला आहे. (Mumbai Indians)
२५२० – करुण नायरने आयपीएलमध्ये तब्बल २,५२० दिवसांनंतर अर्धशतकी टप्पा पार केला. यापूर्वी, २०१८ च्या मोसमात पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने अर्धशतक लगावले होते. आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूंच्या दोन अर्धशतकांदरम्यानचा हा सर्वाधिक कालावधी आहे. यापूर्वी, ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये २०१७ ते २०२४ असे २५१६ दिवसांनंतर अर्धशतक लगावले होते. परंतु, यादरम्यान सहा आयपीएल मोसमात हेड खेळलाच नव्हता. (Mumbai Indians)
३ – या सामन्यात दिल्लीच्या डावादरम्यान जसप्रीत बुमराहच्या एकोणिसाव्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर दिल्लीचे तीन फलंदाज धावबाद झाले. आयपीएलमध्ये प्रथमच अशाप्रकारे रन-आउटची हॅट्ट्रिक पाहायला मिळाली. जगभरात टी-२० क्रिकेटमध्ये सलग तीन चेंडूंवर फलंदाज धावबाद होण्याची ही केवळ पाचवी वेळ होती. भारतात यापूर्वी एकदाच आसाम-त्रिपुरा सामन्यादरम्यान अशी धावबाद हॅट्ट्रिक झाली होती.
५९ – मुंबईच्या तिलक वर्माने या सामन्यात ५९ धावांची खेळी करत विजयास हातभार लावला. आयपीएलमध्ये प्रथमच त्याचे अर्धशतक संघाच्या विजयासाठी साहायक ठरले. त्याने यापूर्वी झळकावलेल्या सातही अर्धशतकांवेळी मुंबई संघास पराभवाचा सामना करावा लागला होता.
४ – यंदाच्या मोसमात दिल्लीला सलग चार विजयांनंतर प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलमध्ये आतापर्यंत सुरुवातीचे सलग चार, तर दोन संघांना सुरुवातीचे सलग पाच सामने जिंकण्यात यश आले आहे.
२६ – करुण नायरने पॉवर-प्लेदरम्यान बुमराहच्या ९ चेंडूंमध्ये २६ धावा फटकावल्या. बुमराहला पॉवर-प्लेदरम्यान कोणत्याही एका फलंदाजाने फटकावलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
हेही वाचा :