मुंबई- बंगळुरू अंतर आठ तासांत पार करता येणार

विटा; प्रतिनिधी : नवीन मुंबई – पुणे – बंगळुरू महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास आठशे किलोमीटरचे अंतर आठ तासांत पार करता येऊ शकेल. या महामार्गावर पाच ठिकाणी विमान उतरण्याची सोय करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी येथे दिली.

या महामार्गापैकी सांगली जिल्ह्यात ७४ किलोमीटरचा टप्पा आहे. या नवीन महामार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६०मधील दहिवडी – मायणी – विटा या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीट दुपदरीकरण, चौपदरीकरणासह पुनर्बांधणी आणि दर्जोन्नतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आदी उपस्थित होते.

दहिवडी-मायणी-विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास ६०० कि. मी. पर्यंत पोहोचली आहे. ६० किलोमीटर लांबीच्या आणि १७३ कोटीच्या सांगली-तासगाव बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे भूसंपादनाचे कामही सुरु झाले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल. या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. (Nitin Gadkari)

केंद्रीय जलसंधारण मंत्री असताना टेंभू, म्हैसाळ योजनांना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याची आठवण सांगून या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट झाला आहे. हिरवे शिवार फुलल्याचे पाहून समाधान वाटत असल्याच्या भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी