नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना ५० तासांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला तर त्यांना निलंबनाचा सामना करावा लागतो. मग मुख्यमंत्री तुरुंगात जाऊनही पदावर कसे राहू शकतात, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. (Modi in Bihar)
शुक्रवारी २२ (ऑगस्ट) गया येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.
एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला ५० तास तुरुंगवास भोगावा लागला तर त्याला आपोआपच नोकरी गमवावी लागते, मग तो ड्रायव्हर असो, लिपिक असो किंवा शिपाई असो. पण मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधानही तुरुंगातून सरकारमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकतात… काही काळापूर्वी, आपण पाहिले की तुरुंगातून फायलींवर स्वाक्षरी कशी केली जात होती आणि तुरुंगातून सरकारी आदेश कसे दिले जात होते. नेत्यांची अशी वृत्ती असेल तर आपण भ्रष्टाचाराशी कसे लढणार?… एनडीए सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा आणला आहे आणि पंतप्रधानही त्याच्या कक्षेत येतात…,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (Modi in Bihar)
नेत्यांना संरक्षण देण्याचा विरोधकांचा प्रयत्न
काँग्रेस, राजद आणि डावे पक्ष जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नवीन कायद्यांना विरोध करत आहेत, असा आरोप करून मोदी म्हणाजे, ‘‘राजेंद्र बाबूंसारखे आमचे पूर्वज कल्पनाही करू शकत नव्हते की तुरुंगात असलेले लोक संवैधानिक पदांवर राहतील. या पक्षांना चुकीचे काम केल्यामुळे आणि परिणामांना घाबरल्यामुळे चौकशीची भीती वाटते.’’
‘‘मी घुसखोरांबद्दल चिंता व्यक्त केली होती, आम्ही त्यांना देशात स्थायिक होण्याची आणि देशातील तरुणांचे हक्क हिरावून घेण्याची परवानगी देऊ शकत नाही. आम्ही त्यांची ओळख पटवून देऊ. काँग्रेस आणि राजद मतपेढी आणि तुष्टीकरणासाठी या घुसखोरांचे संरक्षण करत आहेत. बिहारच्या जनतेने घुसखोरांपासून सावध राहण्याची गरज आहे,’’ असे ते म्हणाले. (Modi in Bihar)
१३,००० कोटींच्या विकासकामाचे उदघाटन
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बिहारमधील सुमारे १३,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये वीज, रस्ते, आरोग्य, शहरी पायाभूत सुविधा आणि पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.
त्यांनी गया आणि दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस आणि वैशाली आणि कोडरमा दरम्यान बुद्धिस्ट सर्किट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे बौद्ध स्थळांवर कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.