मणिपूर : जमाव नियंत्रित करण्यासाठी गोळीबार; एक तरुण ठार

इम्फाळ/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मणिपूरच्या खोऱ्यात हिंसाचार आणि निदर्शने सातत्याने वाढत आहेत. जिरीबाम जिल्ह्यात रविवारी (दि.१७) झालेल्या गोळीबारात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. जमावाने भाजप-काँग्रेसच्या कार्यालयांची तोडफोड सुरू केली. बाबुपारा भागात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी गोळीबार केल्याची घटना घडली. अथौबा असे मृताचे नाव आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडवर असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन मणिपूरमध्ये आणखी पन्नास तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला.

हिंसाचारादरम्यान, जमावाने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यालयांची तोडफोड केली आणि फर्निचर व इतर वस्तूंना आग लावली. जिरीबाम पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर या घटना घडल्या. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मणिपूरमधील काही आमदार आणि मंत्रीही दिल्लीत बैठकीला आले होते. त्यानंतर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या आणखी पन्नास तुकड्या मणिपूरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या घटनांमध्ये मणिपूर पोलिसांनी २३ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल, सात गोळ्या आणि आठ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

मणिपूरमध्ये वाढत्या हिंसाचारामुळे इम्फाळ पश्चिम आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खोऱ्यातील सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. यापूर्वी मणिपूरमध्ये सहा जणांच्या हत्येनंतर परिस्थिती चिघळली होती आणि हिंसाचार पसरू लागला होता. मणिपूरमधील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ने (एनपीपी) भाजपच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. ‘एनपीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी भाजपचे प्रमुख जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून राज्यातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे, की मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटाचे निराकरण करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ६० जागांच्या विधानसभेत ३२ जागा जिंकल्या होत्या; परंतु ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्याने भाजपचा आकडा आता ३२ वर आला आहे. या घडामोडींमुळे विधानसभेत भाजपची स्थिती कमकुवत होताना दिसत आहे.

यापूर्वी कुकी पीपल्स पार्टीने (केपीए) जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘एनडीए’ सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.  सिंह यांना बदलण्याची मागणी भाजपच्या वीसहून अधिक आमदारांनी केली आहे. त्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. हिंसक निषेधाच्या ताज्या घटना शनिवारी रात्री घडल्या. जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची हत्या केली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी १६ नोव्हेंबरला मणिपूरमधील तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यांची घरे जाळण्यात आली. मंत्री आणि आमदारांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यानंतर राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सात जिल्ह्यांत इंटरनेट सेवा ठप्प झाली. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तर-पूर्व राज्यात शांतता सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलण्याचे निर्देश उच्च अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर सोमवारी पुन्हा बैठक घेतली.

दीड वर्षापासून हिंसाचार

मणिपूर गेल्या एक-दीड वर्षाहून अधिक काळ वांशिक संघर्षाशी झुंजत आहे. मणिपूरमधील बहुसंख्य मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आल्यानंतर गेल्या वर्षी तीन मे रोजी जातीय हिंसाचार झाला. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात कुकी आणि मेतेई समुदायातील २२० हून अधिक लोक आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत.

Related posts

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा